Union Budget Nirmala sitharaman 2026 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून त्याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक करत, “मागील अकरा वर्षांत असा सर्वसमावेशक आणि जनतेचा विचार करणारा अर्थसंकल्प सादर झाला नव्हता” अशी प्रतिक्रिया दिली.
गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारा हा अर्थसंकल्प ( Union Budget Nirmala sitharaman 2026 ) आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. विशेषतः गरीब, सामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाजन म्हणाले, “आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसतात. प्रत्येक घटकाचा विचार करून योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा थेट फायदा सामान्य माणसाला होईल.” त्यांनी स्पष्ट केले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला असून, त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध सवलती आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. रोजगार, स्वयंरोजगार, लघुउद्योग आणि स्टार्टअप्ससाठी महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा यात समावेश आहे. यामुळे महिलांचा आर्थिक सहभाग वाढेल आणि त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होतील, असे महाजन यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी ऊर्जा क्षेत्राबाबत अर्थसंकल्पातील तरतुदींवर विशेष भर दिला. सौर ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना देण्यात आली असून, याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामीण भागाला होणार आहे. स्वस्त आणि मुबलक वीज उपलब्ध झाल्यास शेती, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “दहा वर्षांपूर्वी अनेक भागांत वीज उपलब्ध नव्हती. आज परिस्थिती बदलली आहे. येत्या काही वर्षांत भारत ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण होईल. इतकेच नव्हे तर इतर राष्ट्रांना वीज पुरवठा करण्याची क्षमता भारत निर्माण करेल,” असे महाजन यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. “कुंभमेळ्यासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात नसते. मात्र कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी राज्य सरकारने जे जे मागितले होते, ते केंद्र सरकारने आधीच मंजूर केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा राज्य शासनाच्या तिजोरीतून होणार आहे आणि केंद्र सरकारदेखील त्याला निश्चितच मदत करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपच्या इतर नेत्यांकडूनही या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. महिला केंद्रित धोरणे, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणाऱ्या योजना यामुळे हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्व घटकांचा विचार करणारा, महिला सक्षमीकरणावर भर देणारा आणि ‘विकसित भारत’च्या दिशेने देशाला नेणारा असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.