Top 10 News Raj Thackeray | 1. राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात वादळ घालत आहे. या चर्चेमुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढली आहे. संजय शिरसाट यांनी ‘चांडाळ चौकडी’ एकत्र येऊ देणार नाही, अशी टीका करतानाच “ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्या, आनंदच होईल” असा विरोधाभासही व्यक्त केला. दुसरीकडे, शुभांगी पाटील यांनी एकविरा देवीच्या दर्शनाला जाऊन दोघे भाऊ एकत्र यावेत, यासाठी साकडे घातले.
2. उदय सामंत यांची खोचक टीका – “हा क्रीडा महोत्सव आहे का?”
मनसे-उद्धव ठाकरे युतीच्या चर्चांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपरोधिक शैलीत टीका करत म्हटले की, “बीजेपीशी बोलायचं नाही, शिंदेंची सावली पडता कामा नये, हे काही युतीचे निकष नाहीत. हा क्रीडा महोत्सव आहे का?” त्यांनी स्पष्ट केलं की, आम्हाला कोणाच्याही युतीविषयी पोटदुखी नाही, पण ही युती प्रत्यक्षात येईल असं वाटत नाही.
Top 10 News Raj Thackeray | 3. राजू शेट्टी यांचा आरोप – “आपत्ती असूनही विमा कंपन्यांनी ५०,००० कोटी कमावले”
नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, शेतकऱ्यांवर संकटं कोसळत असताना विमा कंपन्या मात्र ५० हजार कोटी रुपयांचा नफा कमावत आहेत. त्यांनी याला थेट सरकारच जबाबदार ठरवले.
4. आशिष शेलार यांचं वक्तव्य – “राज ठाकरेशी आता वैयक्तिक संबंधही संपले”
राज-उद्धव युतीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी वक्तव्य करत सांगितले की, आता राज ठाकरे यांच्याशी वैयक्तिक संबंधही संपुष्टात आले आहेत. यावरून भाजपकडून युतीच्या शक्यतेविषयी नाराजी स्पष्ट झाली आहे.
5. संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसवर टीका
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत २२ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. “पक्षाने मला काम करण्याची संधी दिली नाही, अनेकदा डावललं,” अशी टीका करत त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत सांगितले की, “ज्यांनी मोठं केलं, त्यांच्यावर आरोप करायचे नसतात.”
6. ‘पिंक ई-रिक्षा’ योजना – १० हजार गरजू महिलांना रोजगाराची संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे ‘पिंक ई-रिक्षा’ वाटप योजनेची सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १० हजार महिलांना सवलतीच्या दरात रिक्षा देण्यात येणार आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत.
7. नीलम गोऱ्हे यांचा इशारा – “ठाकरे बंधूंनी शिंदेंना घाबरू नये”
राज-उद्धव युतीबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत आहेत. त्यामुळे इतरांनी कुठला मार्ग घ्यायचा, हे त्यांना ठरवू द्या, पण शिंदेंना घाबरून निर्णय घेऊ नयेत, असा सल्ला दिला.
8. कोकणात बिडवलकर खून प्रकरणावरून राजकीय वाद
ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी सांगितले की, “निलेश राणे चांगले काम करत असून त्यांच्यावर आरोप केल्यामुळे कामाच्या वेगावर परिणाम होऊ शकतो.”
9. महाराष्ट्र भाजपची पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने १२२१ मंडळांची स्थापना केली असून, त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
10. कर्नाटकचे निवृत्त DGP ओम प्रकाश यांची हत्या
कर्नाटकचे निवृत्त पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची त्यांच्या बंगळुरुतील निवासस्थानी हत्या झाली. ६८ वर्षीय ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला असून, प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे. ही घटना संपूर्ण देशात खळबळजनक ठरली आहे.