Top 10 News Bulletin | टॉप १० न्यूज बुलेटिन ( 30 April 2025 )

Top 10 News Bulletin | १. जातनिहाय जनगणनेस केंद्र सरकारची मंजुरी – मोठा निर्णय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. विरोधकांची दीर्घकालीन मागणी असलेल्या या विषयावर आता पावले उचलण्यात आली असून, येत्या जनगणनेसोबतच जातनिहाय आकडेवारी संकलित केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा निर्णय क्रांतिकारक ठरवला असून, काँग्रेसने सत्तेत असताना अशी हिंमत दाखवली नाही असा टोला त्यांनी लगावला.


२. अजित पवारांचं स्वागत, FRP वाढ आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने पाऊल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं असून, FRPमध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यांनी जातीय जनगणना भविष्यात जातीव्यवस्थेचं निर्मूलन करण्यास मदत करेल, असा विश्वासही व्यक्त केला.


3. शिलाँग-सिलचर महामार्गाला २२,८६४ कोटींची मंजुरी

Top 10 News Bulletin | केंद्र सरकारने मेघालय व आसाम यांना जोडणाऱ्या शिलाँग-सिलचर महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा महामार्ग १६६.८ किमी लांबीचा असून, या प्रकल्पावर २२,८६४ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हे उत्तर-पूर्व भारतासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


४. पहलगाम दहशतवादी हल्ला – लष्कराला फ्री हँड, युद्धजन्य स्थितीची शक्यता

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या प्रमुखांशी बैठक घेत लष्कराला फ्री हँड दिला आहे. निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी यावर प्रतिक्रिया देताना, पुढील कारवाई सर्जिकल स्ट्राईकपेक्षा अधिक तीव्र होऊ शकते, असा इशारा दिला.


५. शरद पवारांची अधिवेशन बोलवण्याची मागणी, जातपात बाजूला ठेवून एकत्र यावे – आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला देशावरचा थेट हल्ला असे संबोधित केले आहे. त्यांनी तातडीने संसद विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. तसेच जाती, धर्म, भाषा बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन देशवासीयांना केले.


६. राधाकृष्ण विखे पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा, जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया

भाजप नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 9 कोटींच्या साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, प्रकरण पूर्ण माहितीशिवाय भाष्य करणं योग्य नसल्याचं सांगितलं.


७. बीडच्या खोक्या भोसलेला न्यायालयाचा दणका

बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले या आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यावर पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याने दोन व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली होती.


८. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त – देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देवेन भारती यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना गुन्हे शाखेतील अनुभव असून, ही नियुक्ती मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.


९. बंगाली मुस्लिमांवर शिवसेनेचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

कल्याणमधील शिवसेनेच्या तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी बंगाली मुस्लिमांना गाव सोडण्याचा इशारा दिला असून, त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.


१०. न्यायमूर्ती भूषण गवई ठरणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली असून, ते १४ मे रोजी पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रासाठी ही मोठी गौरवाची बाब मानली जात आहे.

Leave a Comment