Top 10 News | 1. काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का – पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये
सांगली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज (13 ऑगस्ट) आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गोटात मोठी फोड पाडली आहे. यामुळे सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
2. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत
राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता आणि आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. 20-25 हजार कार्यकर्त्यांसह त्या पक्षात प्रवेश घेणार असून, या हालचालीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
3. स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणावरून भुजबळ नाराज, सरकारचे नवे परिपत्रक
पालकमंत्रीपदाच्या तणावानंतर आता ध्वजारोहणाच्या मानावरून महायुतीत वाद पेटला आहे. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकऐवजी गोंदिया येथे ध्वजारोहणाची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांनी नकार दिला. परिणामी, आता मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदियात ध्वजारोहण करतील. याबाबत शासनाने नवे परिपत्रक जारी केले असून, महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
4. मनोज जरांगे यांचा मराठवाडा संवाद दौरा – मुंबईत मोठा मोर्चा
मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या ते मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर असून, आंदोलनाच्या काळात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
5. मांसबंदी व वैयक्तिक स्वातंत्र्यावरून राजकीय वादंग
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, संभाजीनगर आणि इचलकरंजी महापालिकांनीही असे आदेश काढले आहेत. आदित्य ठाकरे यांनी “काय खायचं-न खायचं हा नागरिकांचा हक्क” असे ठामपणे सांगत प्रशासनावर टीका केली. संजय राऊत यांनी “शिवाजी महाराज वरणभात खाऊन युद्ध लढत नव्हते” असा टोला लगावला, तर विजय वडेट्टीवार यांनी हा ‘तुघलकी निर्णय’ मागे घेण्याची मागणी केली.
6. नाफेड कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कांदा आंदोलन
कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने नाफेडच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. शेतकऱ्यांना योग्य दर आणि पारदर्शक खरेदी प्रक्रिया यांची मागणी करण्यात आली. घोषणाबाजी करत काँग्रेसने शासनावर हल्लाबोल केला.
7. मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन आणि वाहतूक बंदी
मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 29 ऑगस्टदरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, कुडाळ-हुमरमळा येथे रस्त्यावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांविरोधात माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन झाले. शिवसैनिकांनी दूध अभिषेक आणि घोषणाबाजी करून महायुती सरकारवर टीका केली.
8. दादर कबुतरखाना प्रकरण हायकोर्टात
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या कारणावरून महापालिकेने त्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः दादरच्या कबुतरखान्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
9. ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ – सुप्रिया सुळे यांची टीका
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमुळे घराघरात वाद निर्माण होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सासू-सुना, नणंद-जाऊ यांच्यात भांडणं वाढत असल्याने शासनाने सरसकट पात्र महिलांना लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “शासनानेच घराघरात भांडणं लावली आहेत” असेही त्यांनी म्हटले.
10. बच्चू कडूंना तीन महिन्यांची शिक्षा पण जामीन मंजूर
2018 मध्ये सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कैदेची व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, त्यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे कडू यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.