Top 10 News |1. RBI कडून EMI सवलतीचा संकेत – व्याजदरात कपात होण्याची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात आपला चलनविषयक आढावा सादर करणार आहे. महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर RBI रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यासारख्या कर्जांच्या EMI मध्ये सवलत मिळण्याची आशा आहे. ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बातमी ठरू शकते.
2. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका; प्रवीण दरेकरांचा करारा प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी 25 वर्षांत काळाराम मंदिरात पाऊल ठेवले नाही, असा आरोप केला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीसांनी गेल्या वर्षी मंदिरात दर्शन घेतल्याचा व्हिडिओ ट्विटवर असल्याचे सांगत राऊत यांच्यावर स्मृती कमजोर झाल्याचा टोला लगावला. तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्लाही दिला.
3. गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद चिघळला आहे. खडसे यांनी महाजन यांच्यावर एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला, तर महाजन यांनी खडसे हे महाचोर आहेत, असा पलटवार केला. दोघांनीही एकमेकांवर खाजगी माहिती उघड करण्याची धमकी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
4. अजित पवारांचं अप्रत्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र
बारामतीत एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मी इतकं काम केलंय, तसं दुसऱ्या कोणत्याही आमदाराने केलं नसेल”, असं वक्तव्य करत बारामतीत पूर्वीची स्थिती वेगळी होती, असा अप्रत्यक्ष टोला शरद पवार यांना लगावला. यावर संजय राऊत यांनी लगेच प्रत्युत्तर देत, “शरद पवारांवर चिमटा घेणं अजितदादांना परवडणार नाही”, असं म्हटलं.
5. गडकरींचं जातीय वक्तव्य – ‘बावनकुळे यांना जातीचा फटका बसेल तेव्हा कळेल’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. “जेव्हा जातीचा फटका बसेल, तेव्हा त्यांना कळेल”, असं वक्तव्य करत गडकरी यांनी पक्षातील अंतर्गत ताणतणाव सूचित केला.
6. रामदास तडस यांना राममंदिरात प्रवेश नाकारला
रामनवमी निमित्त पूजेचा कार्यक्रम सुरू असताना, माजी खासदार रामदास तडस यांना रामाच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना वर्ध्यात घडली. पुजाऱ्याने सोवळं आणि जानवं नसल्याने त्यांना रोखल्याचा आरोप तडस यांनी केला आहे. यावरून धार्मिक परंपरा आणि सामाजिक समतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
7. चंद्रपूरमध्ये भाजपची गटबाजी चव्हाट्यावर
भाजपच्या स्थापना दिनीच चंद्रपूर जिल्ह्यात दोन गटांमध्ये स्पर्धा स्पष्टपणे दिसली. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. यावर ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजप ‘काँग्रेस’ होऊ नये, अशा शब्दात इशारा दिला.
8. कृषिमंत्री कोकाटे यांच्या विधानावरून सांगलीत पुतळा दहन
कर्जमाफीबाबत दिलेल्या विधानामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध पत्करावा लागला. सांगलीत कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत सरकारवरही टीका करण्यात आली.
9. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाईचे संकेत
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ कारवाईचा इशारा दिला. धर्मदाय रुग्णालय नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
10. रामनवमी शोभायात्रेवर मोमीनपुरा येथे मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण
नागपूर शहरातील मोमीनपुरा भागात रामनवमीच्या शोभायात्रेवर मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करण्यात आली. दंगलीनंतर प्रथमच काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश दिला.