Top 10 Maharashtra Political News | 1. ठाकरे बंधू एकत्र येणार? अमित ठाकरेंचा अनौपचारिक संकेत!
मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईत मनसे कार्यालयाचे उद्घाटन करताना अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला दुजोरा दिला. माध्यमांशी बोलायला त्यांनी नकार दिला तरी गप्पांमधून या राजकीय चर्चांना नवा रंग मिळाला आहे. येत्या काळात मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे संघटनात्मक कामासाठी दौरे करण्याचे त्यांनी सूचित केले.
2. आषाढी एकादशीसाठी २४ तास विठ्ठल दर्शन; २७ जूनपासून तयारी सुरू
आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला होणार आहे. या पार्श्वभूमीवर २७ जूनपासून मंदिरात २४ तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली असून १५ जूनला टोकन दर्शनचा डेमो होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेसाठी आमंत्रण दिले जाणार आहे.
3. “मुख्यमंत्री भाजपचा आहे हे लक्षात ठेवा” – नीतेश राणे यांचा शिवसेनेला इशारा
भाजप मंत्री नीतेश राणे धाराशिव येथे आक्रमक होते. त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सुनावताना स्पष्ट केलं की, “मुख्यमंत्री भाजपचाच असेल, कोणी कितीही नाचलं तरी.” यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
4. ‘गिरे भी तो टांग ऊपर’ – राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं, “फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली, पण जनतेने त्यांना उत्तर दिलं. ते सतत मोदींवर परदेशात टीका करतात आणि भारताची बदनामी करतात,” असा त्यांचा टोला होता.
5. “जनतेच्या मताचा आदर शिका” – शंभूराज देसाईंचा राहुल गांधींना सल्ला
राहुल गांधींच्या फिक्सिंगच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “स्वतः हरल्यावर फिक्सिंगचे आरोप करणे योग्य नाही, लोकशाहीत जनतेचा निर्णय मान्य करायला हवा,” असा थेट सल्ला त्यांनी दिला.
6. राहुल गांधींचे आरोप हास्यास्पद – निवडणूक आयोगाचा ठणकाव
राहुल गांधींनी महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. यावर निवडणूक आयोगाने त्यांना जोरदार प्रतिउत्तर देत म्हटलं की, “हे आरोप पूर्णपणे हास्यास्पद असून कायद्याच्या राजवटीचा अपमान करणारे आहेत.” आयोगाने त्यांचे दावे फेटाळले आहेत.
7. शरद पवारांचे वक्तव्य आणि शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य निवडणुका महाआघाडीसोबत लढाव्यात, असं अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटले. यावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली की, “उद्धव ठाकरेंनी लोकसभा-विधानसभा MVAसोबत लढल्या, त्यामुळे स्थानिक निवडणुका देखील तशाच लढाव्यात, असा पवारांचा हेतू असावा.”
8. ठाकरे सेनेचं ‘क्या हुआ तेरा वादा’ आंदोलन सरकारविरोधात पेटलं
ठाकरे गटाच्या शिवसेनेनं महायुती सरकारच्या वचनभंगाविरोधात नांदेडमध्ये आंदोलन केलं. “क्या हुआ तेरा वादा” या टॅगलाईनखाली सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिण योजना यांसारख्या मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला.
9. ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपला अडचण नाही – पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं, “ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपला कोणतीही अडचण नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि राज्यातही सत्ता आमच्याकडे आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्या सध्या राज्यभर तीर्थक्षेत्रांवर प्लास्टिकमुक्त मोहिम राबवत आहेत.
10. मनसेची स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाल वाढली
नवी मुंबईत अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचे उद्घाटन झाले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू झाली आहे. यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मनसे पुन्हा एकदा स्वतःचं स्थान निर्माण करू पाहतेय.