Samruddhi Highway | मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 जून रोजी मोठ्या थाटात पार पडले. या तीन दिग्गज नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. मात्र, उद्घाटनानंतर काही तासांतच या प्रकल्पाच्या खर्चावरून काँग्रेसकडून मोठा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकल्पात तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा महामार्ग भ्रष्टाचाराचं कुरण ठरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीस 55 हजार कोटींच्या खर्चात समृद्धी महामार्ग पूर्ण होणार होता, पण प्रत्यक्षात तो 70 हजार कोटींवर गेला आहे.
‘श्वेतपत्रिका काढा!’ – काँग्रेसची मागणी
सपकाळ यांनी फडणवीस सरकारला थेट आव्हान दिलं आहे की जर सरकारकडे नैतिकता शिल्लक असेल, तर समृद्धी महामार्गाबाबत श्वेतपत्रिका (White Paper) प्रसिद्ध करावी. या श्वेतपत्रिकेत प्रकल्पासाठी नेमका किती खर्च झाला, प्रत्येक टप्प्याचा खर्च, शेतकऱ्यांना किती भरपाई दिली, कोणत्या कंत्राटदारांना किती रक्कम मिळाली, झाडं लावण्याचा खर्च किती झाला आणि टोलवसुलीचा तपशील काय आहे – हे सगळं सविस्तर मांडावं, अशी मागणी त्यांनी केली.
तसंच, त्यांनी समृद्धी महामार्गावरून मिळालेल्या पैशातूनच “50 खोके एकदम ओके” प्रकरण उभं राहिल्याचा आरोप करत भाजप व शिंदे गटाला घेरलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र गाडीत
उद्घाटनाच्या दिवशी एक खास क्षण समृद्धी महामार्गावर पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंनी सुरुवातीस गाडी चालवली. त्यांच्याजवळ फडणवीस होते आणि मागे अजित पवार. थोड्या वेळाने फडणवीसांनी स्टेअरिंग हाती घेतलं. हा प्रवास केवळ रस्त्यावरचा नव्हता, तर सत्तेतल्या समन्वयाचं आणि सामंजस्याचंही दर्शन देणारा होता.
यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवतोय. काही काळजी करू नका. आम्ही तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत. चांगलं ड्रायव्हिंग आहे आमचं. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे.”
त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हसत हसत चिमटा घेतला, “अर्धी अर्धी गाडी चालवायची अगोदरच ठरलेलं होतं!”
घोडबंदर-भाईंदर प्रकल्पावरही आरोप
फक्त समृद्धी महामार्ग नव्हे, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पातही 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या प्रकल्पाची निविदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली, हे सरकारला मान्य करावं लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असा दावाही केला की, समृद्धी महामार्गातही अशाच पद्धतीने घोटाळे झाले असून काही ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळपट्टी झाली आहे.