Pune Rain Update News | पुणे शहरात शनिवारी पडलेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात अक्षरशः जलप्रलयाचे चित्र पाहायला मिळाले. लाखो कोटींची गुंतवणूक असलेल्या या अत्याधुनिक आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते तळ्यात परिवर्तित झाले. सोशल मीडियावर पाण्यातून मार्ग काढत जाणाऱ्या पीएमटी बसचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात आणि देशभरात पुणे महापालिकेच्या नियोजनशून्यतेवर टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राज्य सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “हिंजवडी आयटी पार्क हे महाराष्ट्राचं नव्हे, तर देशाच्या आणि संपूर्ण जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेलं महत्त्वाचं केंद्र आहे. येथे हजारो नव्हे, तर लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. देशभरातील तसंच जागतिक आयटी कंपन्या येथे कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये लाखो युवक कार्यरत असून, त्यांना अशा पूरस्थितीतून मार्ग काढत कार्यालयात पोहोचावं लागतंय, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.”
जगताप पुढे म्हणाले की, “हिंजवडी ही कोणतीही झोपडपट्टी किंवा मागास खेडं नाही. हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आयटी क्लस्टर आहे. मात्र आजही तिथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. एवढा पाऊस झाला की पूर्ण रस्ता जलमय होतो, वाहतूक ठप्प होते. शहरातल्या आयटी पार्कची ही परिस्थिती असल्यास ग्रामीण भागात काय होत असेल, याचा अंदाज येतो.”
राज्य सरकारवर सरळ टीका
प्रशांत जगताप यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर सरळ टीका करत म्हणाले की, “ही परिस्थिती म्हणजे पूर्णतः नियोजनशून्य शहर व्यवस्थापनाचं लक्षण आहे. महापालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, पालकमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तात्काळ आत्मपरीक्षण केलं पाहिजे.” त्यांनी यावेळी प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही बोट ठेवत सांगितले की, “दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळतं आणि तरीसुद्धा पावसाळ्यापूर्वी कोणतीही ठोस तयारी केली जात नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”
सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अनेक नागरिक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सांगितले की, दर वर्षी असेच होते पण कोणतीही सुधारणा होत नाही. काहींनी सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ दाव्यालाही खो घातला.
तज्ज्ञांकडूनही गंभीर चिंता व्यक्त
शहर नियोजनात काम करणाऱ्या तज्ज्ञांनीही हिंजवडी परिसरातील जलनिचरा व्यवस्था आणि ड्रेनेज सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वाढत्या अनियोजित बांधकामांमुळे नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे कारणही पुढे आले आहे. त्यामुळे काही मिनिटांच्या पावसानंतरही रस्त्यांवर पाणी तुंबते.
उपाययोजना करणे अत्यावश्यक
राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत असले तरी, येत्या काळात असे प्रकार टाळायचे असतील तर हिंजवडी परिसरातील ड्रेनेज सिस्टीमची तातडीने पुनर्रचना, सखोल सफाई, पाणी निचऱ्याचे योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कृती आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा पुण्यासारख्या स्मार्ट सिटीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शेवटी एकच प्रश्न – जबाबदार कोण?
प्रशांत जगताप यांनी उपस्थित केलेला प्रश्न फारच महत्त्वाचा आहे – “ज्याठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक आहे, हजारो लोक काम करतात, त्या ठिकाणीही जर सरकार पायाभूत सुविधा देऊ शकत नसेल, तर मग शहरी नियोजनाचा अर्थ काय?”
ही फक्त तात्पुरती संतापाची लाट नसून प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. अन्यथा दरवर्षी पावसात बुडणारी पुणेकरांची आशा आणि अपेक्षा हीच ‘जलसमाधी’ घेईल.