Mumbai News | राज्यात महानगरपालिका निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत, नगरसेवकांची फोडाफोडी, युती–आघाडींच्या चर्चा, आंदोलनं, वादग्रस्त व्हिडिओ, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी – अशा अनेक घडामोडींनी आजचा राजकीय दिवस गाजवला. जाणून घ्या आजच्या महाराष्ट्र पॉलिटिक्स टॉप 10 अपडेट्स सविस्तरपणे –
1) महापौर आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचे लक्ष
महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही सोडत होणार असून, कोणत्या पक्षाच्या गोटात आनंद तर कुणाच्या गोटात निराशा याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमधील सत्तासमीकरणे या सोडतीवर ठरणार आहेत.
2) नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी यशदाममध्ये प्रशिक्षण
राज्यातील महापालिकांमध्ये 101 नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांना कायदे, अधिकार, कर्तव्ये आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती मिळावी, यासाठी प्रशासनाकडून यशदाम येथे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यामुळे नगरसेवकांचा कारभार अधिक प्रभावी होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
3) कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला
कुर्ल्याच्या न्यू मिल रोड परिसरात फेरीवाल्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. आकाश सिंग यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर संतप्त भाजप कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाजाने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
4) ‘एमपीएससी’ भरतीवर विद्यार्थ्यांचा रोष
गट-ब आणि गट-क पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय जाहीर होऊनही प्रत्यक्षात खासगी कंपन्यांद्वारे भरती सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने आपलाच निर्णय विसरल्याचा आरोप होत असून, यावरून पुन्हा आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.
5) ठाकरे गटाच्या नगरसेवकांना ‘हजर राहा’चा इशारा
शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या नगरसेवकांना गट स्थापनेच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गैरहजर राहिल्यास पक्षविरोधी कारवाईचा इशारा देण्यात आला असून, फोडाफोडीच्या चर्चांमुळे ठाकरे गट सतर्क झाला आहे.
6) राष्ट्रवादी युती ठरली, पण आंबेगावात बंड
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची युती जवळपास निश्चित असली तरी दिलीप वळसेंच्या आंबेगाव तालुक्यात शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण संघर्ष अटळ मानला जात आहे.
7) कल्याण-डोंबिवलीत नगरसेवकांची ‘लपवाछपवी’
महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपले 11 नगरसेवक अज्ञात स्थळी हलवले आहेत. शिंदे सेनेकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
8) सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार आहेत. जागावाटप करून भाजपविरोधात बहुमत मिळवण्याचा दावा करण्यात आला असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
9) ‘लाडकी बहीण’ योजनेवरून महिलांचे आंदोलन
हिंगोलीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता बंद झाल्याने शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. “निवडणुकीनंतर सरकारची बहीण दोडकी झाली का?” असा सवाल करत महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
10) संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
मुंबईच्या महापौरपदावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. “महापौर कोण होणार हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील,” असा आरोप करत त्यांनी भाजपचा विजय नैतिक नसल्याचे विधान केले.