Mumbai News | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला असून शिवाजी पार्कवर झालेल्या संयुक्त प्रचार सभेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या संयुक्त सभेत ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले आणि भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. ‘लाव रे तो व्हिडिओ!’ म्हणत राज ठाकरे तर ‘हे सगळं अदानीकरण चाललंय’ असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
सभेची सुरुवात करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांनी मोठ्या पडद्यावर व्हिडिओ दाखवत देशात, राज्यात आणि विशेषतः मुंबई परिसरात अदानी समूह कशा वेगाने विस्तारत आहे, हे मांडले.
“मुंबई विकायला काढली आहे, देशही विकायला काढला आहे. २०१४ मध्ये गौतम अदानी कुठे होते आणि आज २०२४-२५ मध्ये कुठे आहेत, हे पाहिलं की धक्का बसतो,” असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एक व्यक्ती भेटली, जिने देशात चाललेल्या गोष्टींचं वास्तव सांगितलं. त्यानंतर त्यांनी स्वतः संशोधन सुरू केलं.“जे आता समोर येतंय ते पाहून भीती वाटतेय. देशात निवडणुका न लढवलेल्याच बरं,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.२०१४ पासून आतापर्यंतच्या दहा वर्षांत जे घडलं, ते धक्कादायक असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.“हिंदी-इंग्रजी चॅनलवर कुणी सत्य बोललं तर वरून दट्ट्या येतो. जाहिराती बंद केल्या जातात, चॅनल ब्लॉक केलं जातं. हे सगळं सरकारच्या आशीर्वादानेच होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.“हे सगळं अदानीकरण चाललंय. आमची मुंबई मुंबादेवीच्या नावावरून मुंबई झाली, पण आता ती पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचा डाव त्यांच्या मनात आहे,” असा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी अन्नामलाई प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला.“अन्नामलाई आला, त्याचे आभार मानतो. त्याच्यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला,” असा टोला त्यांनी लगावला.लोकसभेच्या वेळी दिलेल्या ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यांच्याच नेत्याने सांगितलं होतं की संविधान बदलायचं आहे. त्याच नेत्याने त्यांचा बुरखा फाडला.”
सभेत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना जोरदार लक्ष्य करण्यात आलं.राज ठाकरे म्हणाले, “एकीकडे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, मुख्यमंत्री असताना भुजबळांना तुरुंगात टाकायचं आणि आता त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसायचं. अजित पवारांबाबत बैलगाडीभरून पुरावे दाखवले, मग ते पुरावे कुठे गेले?”
उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना थेट आव्हान दिलं.“अजित पवारांविरोधात दिलेले पुरावे जाळायचे की कोर्टात द्यायचे, ते ठरवा. पुराव्यात दम असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या, नसेल तर जाहीर माफी मागा,” असा घणाघात त्यांनी केला.युतीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली.“अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली, अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत. ६६ जागा बिनविरोध केल्या. आज ६६ आहेत, उद्या आकडा वाढेल. लोकांना कसं विकत घेतलं जातंय, हे स्पष्ट दिसतंय,” असा आरोप करण्यात आला.
तसेच बदलापूरमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.उद्धव ठाकरे यांनीही युतीवरून भाजपला सवाल केला.“आम्ही काँग्रेससोबत गेलो तेव्हा म्हणाले हिंदुत्व सोडलं. मग आता फडणवीसांनी काय सोडलं? त्यांनी केलं तर ‘आमर प्रेम’ आणि आम्ही केलं तर ‘लव्ह जिहाद’ का?” असा प्रश्न उपस्थित केला.या सभेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपविरोधातील आघाडी अधिक आक्रमक होणार, हे संकेत या सभेतून मिळाले आहेत.