Malegaon Election | माळेगाव साखर कारखाना निवडणूक 2025 : पराभवानंतरही चंद्रराव तावरे यांची झुंजार भूमिका; अजित पवारांविरोधात लढण्याचा इशारा

Malegaon Election | सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने विजय संपादन करत सत्ता मिळवली. मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’ने हार मानली नसून, अजित पवार यांच्याविरोधात लढाईची घोषणा केली आहे. “माळेगाव कारखान्याच्या विस्तारासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार,” असा ठाम इशारा चंद्रराव तावरे यांनी दिला आहे.

सांगवी येथे आयोजित आभार सभेत चंद्रराव तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विरोधी पॅनलला मिळालेला ७ हजारांपेक्षा अधिक मतांचा पाठिंबा हा त्यांच्या लढ्याचा आधार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “पराभव असूनही आमच्या सोबत शेतकऱ्यांचा विश्‍वास आहे. काही लाचार सभासदांनी पैशांसाठी चुकीचा निर्णय घेतला. पण आम्ही अजूनही सभासदांच्या भल्यासाठी झगडणार आहोत.”

चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. “नवीन अध्यक्ष केवळ इमारती रंगवून, रस्ते बांधून सभासदांना खुश ठेवू पाहत आहेत. मात्र खरी गरज आहे ती कारखान्याच्या विस्ताराची आणि डिस्टिलरीच्या वाढीची. खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचा विस्तार झाला नाही, तर ऊसदराच्या स्पर्धेत तो मागे पडेल,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, “बारामती अॅग्रो, दौंड शुगर, आंबालिका यासारखे खासगी कारखाने दररोज २० हजार टनांहून अधिक ऊस गाळप करतात. माळेगाव मात्र साडेसात ते आठ हजार टनांवरच अडकला आहे. यामुळे येत्या काळात कारखान्याचे तांत्रिक आणि आर्थिक बळ वाढवावे लागेल.”

रंजन तावरे यांनीही अजित पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “माळेगावच्या निवडणुकीसाठी तिसरे पॅनल मुद्दाम तयार करण्यात आले. प्रत्यक्षात हे सर्व पवार एकच आहेत. मतभेदाचे नाटक करत तेच सत्ता मिळवण्याचे डावपेच रचतात. माळेगावचा विजय हा सत्तेच्या दुरुपयोगातून मिळवलेला आहे.”

तावरे गटाच्या म्हणण्यानुसार, चिन्ह वाटपापासून ते मतदान आणि मतमोजणीपर्यंत सर्वच टप्प्यांमध्ये सत्तेचा आणि प्रचंड पैशांचा गैरवापर झाला. “हा पैसा एक दिवस त्यांचा घात करेल,” असा टोकाचा इशाराही त्यांनी दिला.

आभार सभेत तावरे गटाने स्पष्ट केले की, पराभवाने ते खचलेले नाहीत. माळेगावच्या सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढे संचालक मंडळाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणार असून, अध्यक्षांना सातत्याने विस्तारासाठी पत्र देण्यात येणार आहे. ५ लाख लिटर इथेनॉल प्रकल्पासाठी आग्रही राहणार असून, खासगी कारखान्यांपेक्षा अधिक ऊसदर देण्यासाठी व्यवस्थापनाला भाग पाडणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या माळेगाव कारखान्याला पुन्हा सशक्त करण्यासाठी आपण ८५ व्या वर्षीही निवडणुकीत उतरलो, असे चंद्रराव तावरे यांनी सांगितले. अॅड. जी. बी. गावडे, युवराज तावरे, रोहन कोकरे, सतिश घाडगे, शिवाजी गावडे यांच्यासह इतर वक्त्यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

माळेगाव निवडणुकीत तावरे गटाचा पराभव झाला असला तरी, सहकार क्षेत्रातील संघर्ष मात्र संपलेला नाही. आता हा लढा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, ऊसदर, कारखान्याचा विस्तार, सभासदांचे हित या मुद्द्यांवर पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाने दिलेला अजित पवारांविरोधातील इशारा येत्या काळात राजकीय आणि सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण करू शकतो.

Leave a Comment