Maharashtra Top News | महाराष्ट्रातील टॉप १० घडामोडी: खुलताबादचं नाव बदलणार, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Top News | १. खुलताबादचं नाव बदलणार? – संजय शिरसाट यांची घोषणा

शिवसेनेचे नेते आणि समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. त्यांनी असे सुचवले की, औरंगजेबाच्या इतिहासाशी संबंधित ठिकाणी बदल होणे आवश्यक आहे. या घोषणेमुळे राज्यात पुन्हा एकदा नावबदलाचा वाद रंगण्याची शक्यता आहे.


२. अदानी-भाजप युतीवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, “अदानी हे भाजपाचे मालक झाले असून, मुंबईचा ताबा मिळवण्यासाठी कायदेही बदलले जात आहेत.” त्यांनी नागरिकांना सवाल केला की, “खोट्या प्रचाराला बळी पडून ही मुंबई भामट्यांच्या हातात द्यायची का?”


३. राज ठाकरे व जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या वक्त्यांवर बंदीची मागणी

नाशिकमधील अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत राज ठाकरे व जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर बंदीची मागणी करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांवर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडले गेले.


४. करुणा मुंडेंची पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर घणाघात

धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरून वाद पेटला आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन निकालानंतर स्पष्ट केलं की, “धनंजयची आमदारकी रद्द झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.” यावेळी त्यांनी स्वतः धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.


५. नाशिकमध्ये 13 सावकारांवर छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

अवैध सावकारीवर मोठी कारवाई करत नाशिक पोलिस आणि सहकार विभागाने 13 सावकारांवर छापे टाकले. यात काही सावकार हे माजी नगरसेवक व आमदारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता आणि रोकड जप्त करण्यात आली.


Maharashtra Top News | ६. अश्विनी बिद्रे खूनप्रकरणात पीआय अभय कुरुंदकर दोषी ठरला

नऊ वर्षे चाललेल्या खटल्यानंतर अखेर न्यायालयाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला दोषी ठरवले. त्याचं नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवण्यात आलं होतं, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची नोंदही न्यायालयाने घेतली आहे.


७. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावरून शेतकरी संतप्त, राजीनाम्याची मागणी

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या दौऱ्यात कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संताप उसळला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभेने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.


८. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात, तनिषा भिसे मृत्यू प्रकरण गाजतंय

दहा लाखांची अनामत रक्कम न दिल्याने गर्भवती तनिषा भिसेला उपचार न मिळाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, आता अनामत रक्कम घेतली जाणार नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही माहिती घेतली आहे.


९. भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण केले

भाजपने राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. 6 एप्रिल रोजी भाजपच्या स्थापना दिनी ऑनलाईन कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.


१०. काश्मीरमध्ये ‘मराठी पुस्तकांचे गाव’, महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना

उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काश्मीरमध्ये “मराठी पुस्तकांचे गाव” हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला. यामागचा उद्देश मराठी वाचनसंस्कृतीचा विस्तार परराज्यातही व्हावा हा आहे.

Leave a Comment