Maharashtra Top | Maharashtra Top 10 News Updates – 20 ऑगस्ट 2025

Maharashtra Top | 1) बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव

मुंबईतील “दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पॅनलला मोठा धक्का बसला. दोन्ही भावंडांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती, पण त्यांच्या गटातील एकाही उमेदवाराला विजय मिळाला नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी तब्बल 12 जागा जिंकून मुसंडी मारली. महायुती समर्थित उमेदवारांचादेखील विजय झाला. या निकालावरून भाजपने ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोमणा मारत म्हटलं – “दोन शून्यांची बेरीज शून्यच होते, हे गणित शाळेत न शिकलेल्यांनाही कळतं.”


2) फडणवीसांचा ठाकरेंवर वार

बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. “पतपेढीच्या निवडणुकीचे राजकारण करणे चुकीचे आहे, पण ठाकरे बंधूंनी त्यालादेखील राजकीय रंग दिला. त्यामुळेच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं,” असे फडणवीस म्हणाले. भाजपकडून या पराभवाचा भविष्यातील महापालिका निवडणुकांवर मोठा परिणाम होईल, असा दावा केला जात आहे.


3) रोहित पवारांचे शिरसाठांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर तब्बल 500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे राज्यात खळबळ माजली आहे. फडणवीसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत रोहित पवारांना पुरावे द्यायला सांगितले. त्यावर रोहित पवार म्हणाले – “पुरावे नक्की देऊ, पण आपण फक्त बोलत नाही, अभ्यास करूनच आरोप करतो,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.


4) सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबरनंतर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील राजकीय समीकरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे.


5) पावसाचा कहर – नाशिक, कराड व पुण्यात गंभीर परिस्थिती

मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • नाशिक : गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड, गोदाघाट परिसर जलमय झाला आहे.
  • कराड (सातारा) : कोयना धरणाचे दरवाजे उघडल्याने तब्बल 95 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. कृष्णाबाई व मारुती मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
  • पुणे : खडकवासला धरणातून 39 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. एकता नगरसह अनेक भागांत पाणी साचलं आहे. महापालिका व अग्निशमन दल सतर्क आहे.

6) पुणे व कोकण विभागात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार वादळी पावसामुळे दरड कोसळणे, पाणी साचणे यासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


7) शाळांना सुट्टी – पावसाचा तडाखा

सातारा, रायगड, पालघर, ठाणे, सांगली आणि लोणावळा परिसरात पावसाचा जोर पाहता स्थानिक प्रशासनाने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कराड व महाबळेश्वर परिसरात तर पावसाने विक्राळ रूप धारण केलं असून, शालेय विद्यार्थी आणि पालकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


8) शिवसेनेवर नागरिकांचा रोष

मिरा-भाईंदरचे माजी आमदार व शिंदे गटाचे नेते गिल्बर्ट मेंडोसा यांच्या निधनानंतर दुःखाचे वातावरण असतानाच शिवसेना शिंदे गटाने मोठा मंगळागौर सोहळा आयोजित केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुःखद प्रसंगी अशा कार्यक्रमाचे आयोजन अयोग्य असल्याचे म्हणत सोशल मीडियावर टीका सुरू आहे.


9) दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी बंगल्यावर जनता दरबार चालू असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर थप्पड मारली. तो व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


10) मुंबईत मुसळधार पावसाचा फटका – अमिताभ बच्चन यांचं घर चर्चेत

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. वाहतूक ठप्प झाली, तर सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. यातच अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याजवळील रस्ताही पाण्याखाली गेला. या दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Comment