Maharashtra Top 10 | 1. महादेव जानकर यांची कबुली – “एनडीएसोबत युती चूक होती”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त दिल्लीतील कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राजकीय खळबळ उडवणारे वक्तव्य केले. “एनडीएसोबत युती करणे ही आमची चूक होती,” असे जाहीरपणे कबूल करत त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.
2. पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा थरार – 13 एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं
पुण्यात भावे हायस्कूलजवळ एक मद्यधुंद कारचालकाने 13 एमपीएससी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडलं. जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
3. काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान यात्रा 3 जूनपासून
पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये दिलेल्या कृषी आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप करत काँग्रेसने यवतमाळच्या दाभडी गावातून 3 जूनपासून ‘शेतकरी आत्मसन्मान यात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
4. संजय राऊतांवर गुलाबराव पाटील यांचा जोरदार हल्ला
“संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, जिथं जातात तिथं नुकसान होतं,” अशी जहाल टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. जळगावमध्ये राऊत अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खळबळजनक विधान केले.
5. अमरावती महानगरपालिकेत भाजपचा महापौर येणार – रवी राणा यांची घोषणा
युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी अमरावती मनपा व जिल्हा परिषदेवर भाजपसोबत युती करून सत्तेवर येणार असल्याचे जाहीर केले. “आम्ही लहान भाऊ म्हणून भाजपसोबत काम करू,” असेही त्यांनी नमूद केले.
6. निलेश चव्हाण प्रकरण – पोलिसांकडून घरझडती, मोबाईल जप्त
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नेपाळहून अटक केलेल्या निलेश चव्हाणच्या कर्वेनगर येथील घरी पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकत मोबाईल फोन जप्त केले. तो 3 जूनपर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहे.
7. शरद पवार कधीच धर्मांध शक्तींसोबत जाणार नाहीत – संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जवळीक होण्याच्या चर्चेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार कधीच जातीय किंवा धर्मांध शक्तींसोबत जाणार नाहीत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
8. नंदूरबारमध्ये ग्राम सडक योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नंदूरबारच्या गावांमध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. हाताने रस्ता उखडता येतो, अशी तक्रार करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
9. पंकज देशमुख मृत्यू प्रकरण – पत्नीने केला घातपाताचा संशय
आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी सुनीता देशमुख यांनी “ही आत्महत्या नसून घातपात आहे,” असा गंभीर आरोप केला आहे. तपास सीआयडीमार्फत व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
10. पालघर भाजप माजी जिल्हाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा
पालघरचे भाजप माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओही समोर आला असून भाजपसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.