राज्यात आज दिवसभरात राजकारण, प्रशासन, महापालिका निवडणुका, सामाजिक आंदोलन आणि गुन्हेगारी अशा विविध पातळ्यांवर घडामोडी घडल्या. पुण्यापासून डोंबिवली, अमरावती, नाशिक ते सोलापूरपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांनी राजकीय वातावरण तापले. आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे पाहूया—
1) पुणे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष कधी?
पुणे महापालिकेच्या ( Maharashtra Politics ) निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अखेर पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष निवडले जाणार आहेत. निवडणूक लांबल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत.
2) छगन भुजबळ प्रकरणावर अंजली दमानियांची भूमिका
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना एसीबी आणि ईडीकडून दिलासा मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित असल्याने त्यांना ‘क्लीन चिट’ मिळाली नसल्याचा दावा करत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
3) डोंबिवलीतील मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई, राज ठाकरेंची दखल
डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात मराठी तरुणी एकता सावंत हिच्या फूड स्टॉलवर केडीएमसीने केलेल्या कारवाईनंतर मोठा गदारोळ झाला. गर्दी वाढल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून नेते अविनाश जाधव घटनास्थळी दाखल झाले.
4) अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले
अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखर्चित निधीवरून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. विकासकामांसाठी आलेला निधी वेळेवर खर्च का होत नाही? आमदारांना विश्वासात का घेतले जात नाही? असे सवाल करत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला.
5) पिंपरी-चिंचवड महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर
पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्तास्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार असून 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिकांमध्ये एकाच दिवशी सत्ता स्पष्ट होणार आहे.
6) सतेज पाटलांची ‘अजितदादा’ गुगली
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. “अजितदादांकडे अर्थखातं आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळतो. ते सहज सत्तेबाहेर जाणार नाहीत. मात्र भाजपकडून झालेला अपमान पाहता त्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही,” असे म्हणत त्यांनी राजकीय चर्चांना हवा दिली.
7) मुंब्र्यात सहर शेखविरोधात आगरी-कोळी समाज आक्रमक
एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या विधानांमुळे मुंब्र्यात वाद उफाळला आहे. “भारताचं अन्न खावं आणि ढेकर पाकिस्तानच्या नावाने द्यावी, हे मान्य नाही,” असा संतप्त इशारा देत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
8) मीरा-भाईंदर भाजप गटनेतेपदी हसमुख गेहलोत
मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने हसमुख गेहलोत यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. माजी उपमहापौर असलेल्या गेहलोत यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली असून, “दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
9) नाशिक 400 कोटींच्या जुन्या नोटा चोरी प्रकरणात मोठी चौकशी
नाशिकमधील 400 कोटींच्या जुन्या नोटा चोरी प्रकरणात कर्नाटक पोलीस दाखल झाले आहेत. आतापर्यंत 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अपहरणाचा गुन्हाही दाखल आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
10) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील 10 दिवसांत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार असून, अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.