Maharashtra News | 1) होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
पुणे–पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तावर गेलेले चंद्रपूरचे होमगार्ड परतत असताना नांदेडच्या किनवट तालुक्यातील उणकेश्वर येथे खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे 50 होमगार्ड जखमी झाले असून, त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.
2) साताऱ्यात महायुतीत तणाव – बैठकीला भाजपची दांडी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे मंत्री व आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. “पुढची भूमिका शिवसेनेला घ्यावी लागेल,” असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला असून महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा स्पष्ट झाला आहे.
3) एकनाथ शिंदेंचा नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधत पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. मुंबई महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
4) “अजित पवारांची राष्ट्रवादी संपली” – लक्ष्मण हाके
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महानगरपालिका निवडणुकांतील अपयशावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावर जोरदार टीका केली. “ओबीसी नेतृत्वाला बाजूला ठेवल्यामुळेच पक्षाची ही अवस्था झाली,” असा आरोप त्यांनी केला.
5) शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा राजकीय धक्का देणारा निर्णय मानला जात आहे.
6) महापौर हिंदूच होणार – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि हिंदूच होईल,” असा ठाम दावा केला. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तीव्र टीका करत ठाकरे गटाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
7) अहिल्यादेवींच्या वास्तूंवरून मोदींना सवाल
इंदूर संस्थानचे भूषणसिंह होळकर यांनी वाराणसीतील मणिकर्णिका घाट पाडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सवाल उपस्थित केला. “निवडणुकीपुरतंच हिंदुत्व आहे का?” असा थेट प्रश्न करत त्यांनी संताप व्यक्त केला.
8) “शिंदेंच्या डोक्यात काय असतं?” – गुलाबराव पाटील
मुंबईतील नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सूचक टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अस्वस्थता पुन्हा चर्चेत आली आहे.
9) समरजितसिंह घाटगे – भाजप प्रवेशाची औपचारिकता बाकी
कोल्हापुरातील बैठकीला समरजितसिंह घाटगे उपस्थित राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “टेक्निकल प्रक्रिया पूर्ण होईल,” असे संकेत दिले.
10) पंतप्रधान मोदींकडून मुंबई विजयाचं कौतुक
आसाममधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे आभार मानत भाजपच्या मोठ्या विजयाचे कौतुक केले. “हा विकासाचा विजय आहे,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस संपल्याची टीका केली.