Maharashtra News | 1. पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे – महायुतीच्या तयारीला गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 एप्रिल रोजी पुण्यात येणार असून, पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर बंधू स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 12 एप्रिल रोजी रायगडला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड चौकशी समितीच्या अहवालाची माहिती देताना दौऱ्याचे संकेत दिले. हे दौरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
Maharashtra News | 2. सुप्रिया सुळे यांचे उपोषण, अजितदादांचा टोला
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘काम करायचं म्हटलं, तर एका मिनिटात करता आलं असतं,’ असा टोला लगावत, खासदार व आमदारांकडे निधी असूनही आंदोलनाचा मार्ग का अवलंबला गेला, असा सवाल उपस्थित केला.
Maharashtra News | 3. शिर्डीतील भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूमुळे संताप; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर
शिर्डी येथे चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून, मृत व्यक्तींचे नातेवाईक त्यांचे मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर घेऊन गेले. “आमची माणसं परत द्या” अशा भावनिक आरोळ्यांसह त्यांनी पोलिसांवर निषेध व्यक्त केला. यामुळे स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
4. शिवेंद्रसिंह भोसले यांचा अधिकाऱ्यांना इशारा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले हिंगोली दौऱ्यावर असताना, मुख्यालयी अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली शासकीय निवासस्थाने सोडून अधिकारी इतरत्र राहत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
5. बुलढाण्यात माजी सैनिकाने गोळ्या झाडल्या; कारण – शीतपेयाची बाटली
बुलढाण्याच्या शेलापूर येथे माजी सैनिक गणेश चिम यांनी किरकोळ वादातून बंदुकीतून गोळ्या झाडल्याने खळबळ माजली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
6. सरकारी आयुष महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ
राज्यातील आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व योग महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्राध्यापकांसाठी 1.5 लाख, सहयोगी प्राध्यापकांसाठी 1.2 लाख, आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी 1 लाख रुपये मानधन निश्चित करण्यात आले.
7. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर राजू शेट्टी यांचा आरोप
राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर 27 हजार एकर शेतजमीन बळकावण्याचा आरोप केला. त्यांनी यवतमाळच्या मेळाव्यात सांगितले की, शक्तीपीठ महामार्ग हे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारे षडयंत्र आहे, आणि 50 हजार कोटींचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.
8. प्रशांत कोरटकर प्रकरण: जामीन मंजूर पण अटींसह
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, त्याला 50 हजार रुपयांचा जातमुचलका, पोलिसांना सहकार्य, साक्षीदारांना धमकी न देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
9. पुण्यात भाजप महिला आघाडी आंदोलनाच्या समर्थनावर वाद
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील गर्भवती महिलेस मृत्यू प्रकरणी डॉक्टरांच्या क्लिनिकवर तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला केंद्रीय मंत्री मोहोळ व चंद्रकांतदादांनी समर्थन दिले. मात्र खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
10. नागपूर हिंसाचार प्रकरण: फहीम खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला फहीम खान याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.