Kolhapur Viral Audio | जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात एक कथित ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली असून त्यावरून जिल्ह्यातील सहकार आणि स्थानिक राजकारणात नवी चर्चा पेटली आहे. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पाडळी खुर्द मतदारसंघातील पराभव आणि त्यानंतर समोर आलेली ही कॉल रेकॉर्डिंग यामुळे राजकीय वर्तुळात ‘एका फोनने गेम फिरला का?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या निवडणुकीत ( Kolhapur Viral Audio ) सचिन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू सूर्यवंशी रिंगणात होते. प्रचाराच्या काळात ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित राहिली नाही, तर गोकुळमधील जुने राजकीय हिशोब, गटबाजी आणि प्रतिष्ठेचे प्रश्नही यात गुंतले गेले होते. निकालानंतर मात्र एका कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर या पराभवामागे मोठे राजकीय डावपेच असल्याची चर्चा रंगू लागली. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात गेली तीन दशके महाडिक गटाचा प्रभाव होता. मात्र पाच वर्षांपूर्वी विश्वास पाटील यांनी महाडिक गटाची साथ सोडत सत्तांतर घडवून आणले होते. त्या वेळी महाडिक गटाला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि विश्वास पाटील यांच्यातील राजकीय दुरावा सर्वश्रुत आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकीत सचिन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर ‘हा पराभव केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे, तर गोकुळच्या राजकारणातील उट्टे काढण्याचा भाग आहे का?’ अशी चर्चा सुरू झाली. त्यातच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने या चर्चेला आणखी खतपाणी घातले आहे. व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आपल्या वाशी परिसरातील एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना ऐकू येतात, असा दावा केला जात आहे. संभाषणात ते म्हणताना ऐकू येतात की, “मी महाडिक बोलतोय… तुम्हाला राजू सूर्यवंशी माहिती आहे का? तो विश्वास पाटलांच्या उलट उभा आहे.”
त्यात पुढे “राजू मत म्हणजे बीडच्या महादेवाला मदत” तसेच “विश्वास पाटलांच्या उलटं काम तुम्हाला करायला लागतंय” असे वाक्यही असल्याचे सांगितले जाते. संभाषणात संबंधित कार्यकर्ता “होय साहेब, त्यानुसार काम करतो. तुमचा शब्द पडू देणार नाही,” असे उत्तर देताना ऐकू येतो, असा दावा आहे. तसेच “कुठलेही काम असेल तर कारखान्यावर या, मदत करतो,” असेही संभाषणात नमूद असल्याचे बोलले जात आहे. या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी कोणत्याही संबंधित व्यक्तीकडून झालेली नसली, तरी निकालानंतर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. त्यामुळे या क्लिपमधील संभाषण खरे की बनावट, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या निवडणुकीपूर्वी विश्वास पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. गोकुळच्या निवडणुकीतही त्यांनी महाडिक गटाला धक्का दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक ही विश्वास पाटील आणि नरके गटासाठी प्रतिष्ठेची बनली होती. सचिन पाटील यांच्या प्रचारात स्थानिक पातळीवर मोठी ताकद लावली गेली होती. मात्र निकालात त्यांचा पराभव झाला. या पराभवामागील कारणांची मीमांसा नरके गटाकडूनही सुरू होती. काहींनी स्थानिक नाराजी, काहींनी संघटनात्मक कमतरता, तर काहींनी मतांचे विभाजन ही कारणे पुढे केली. मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या सर्व चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात “आप्पाचा विषय लय हार्ड हाय” ही वाक्यरचना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि राजकीय जाणकार या ऑडिओ क्लिपकडे केवळ एका मतदारसंघापुरती बाब म्हणून पाहत नाहीत, तर गोकुळमधील दीर्घकालीन सत्तासंघर्षाचा भाग म्हणून पाहत आहेत. काहींच्या मते, विश्वास पाटील यांनी पूर्वी महाडिक गटाला दिलेला धक्का आणि त्यानंतर निर्माण झालेला दुरावा याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. तर काही जण या क्लिपला राजकीय हेतूने पसरवलेली अफवा मानत आहेत.
या प्रकरणावर महादेवराव महाडिक, विश्वास पाटील किंवा संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ही ऑडिओ क्लिप खरोखरच महाडिक यांची आहे का, की एखाद्याने तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बनावट क्लिप आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होणे ही नवी बाब नाही. मात्र त्यातून निर्माण होणारा राजकीय परिणाम आणि जनमानसावर होणारा प्रभाव मोठा असतो. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता तपासली जाणे आवश्यक आहे.
सध्या कोल्हापुरात या ऑडिओ क्लिपची चर्चा चहाटळांपासून सोशल मीडियापर्यंत रंगली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही गोकुळच्या राजकारणातील संघर्ष संपलेला नसून, तो नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. सचिन पाटील यांच्या पराभवामुळे विश्वास पाटील यांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असले, तरी आगामी सहकार आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या घडामोडींचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यामागील राजकीय हेतू उलगडल्याशिवाय या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता कमीच आहे. एकूणच, “एका फोन कॉलने समीकरण बदलले का?” हा प्रश्न सध्या कोल्हापुरातील राजकारणात केंद्रस्थानी आला असून गोकुळच्या सत्तासंघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.