Kolhapur Mayor | कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली असली, तरी या निवडीकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून पाहिले जात नाही. उलट, या एका निर्णयाने भाजपमधील अंतर्गत गटबाजी, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांतील दरी, दक्षिण कोल्हापूरचे राजकारण आणि खासदार धनंजय महाडिक गटाचे वाढते वर्चस्व उघड झाले आहे. त्यामुळे महापौरपदाची ही निवड सत्तेइतकीच संघटनात्मक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
महापौरपदासाठी अनेक इच्छुक असताना, अखेर रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचे समर्थन करताना “सभागृहात काँग्रेससारख्या मोठ्या आणि आक्रमक विरोधकांचा सामना करण्यासाठी अनुभवी आणि आक्रमक भूमिका घेणारा चेहरा आवश्यक होता,” असे सांगितले. मात्र या अधिकृत भूमिकेमागे भाजपमधील अंतर्गत राजकीय गणिते अधिक प्रभावी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रुपाराणी निकम ( Kolhapur Mayor ) या खासदार धनंजय महाडिक गटाच्या मानल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर भाजपवर महाडिक गटाने आपला वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे चित्र समोर आले आहे. इच्छुकांच्या मोठ्या रांगेतून महापौरपदाची संधी मिळवणे, हे केवळ वैयक्तिक क्षमतेमुळे नव्हे तर संघटनात्मक ताकदीमुळे शक्य झाले, असे भाजपमधील अनेक नेते खासगीत मान्य करत आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ, उपनगरातील मतदारांचे प्रतिनिधित्व आणि आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित या सर्व बाबी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे दिसते. महापौरपद उपनगराकडे देऊन तेथील राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. यातून दक्षिण कोल्हापूरमधील राजकीय पकड मजबूत करण्याचा महाडिक गटाचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो.
रुपाराणी निकम या सर्वसाधारण गटातून निवडून आल्या असून, यापूर्वी त्या ताराराणी आघाडीतून विजयी झाल्या होत्या. मागील कार्यकाळात त्यांनी सभागृहात आक्रमक वक्तृत्व, प्रशासनावर रोखठोक प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारी भूमिका घेतली होती. त्यामुळे ‘सभागृह चालविण्याचा अनुभव’ हा निकष पुढे करत त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून भाजपमधील नाराजी अधिक तीव्र झाली आहे. कारण अनुभवाच्या निकषावर पाहिले असता, माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांचे नाव स्वाभाविकपणे पुढे येत होते. अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेले, संघटनात्मक बांधणीमध्ये सक्रिय राहिलेले आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
भाजपचे ‘सामान्य कार्यकर्त्याला संधी’ हे धोरण नेहमीच अधोरेखित केले जाते. मंत्री चंद्रकांत पाटील यांचीदेखील हीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे यावेळी महापौरपदासाठी निष्ठावंत आणि अनुभवी कार्यकर्त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा पक्षातील अनेकांना होती. मात्र प्रत्यक्षात घडले त्याने ही अपेक्षा फोल ठरली. विशाल शिराळे, विजय देसाई, वैभव कुंभार, प्रमोद देसाई हे देखील इच्छुक होते; मात्र त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांना दुय्यम स्थान मिळाले. पण खाडे-पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावलल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “गटाचे वजन असेल तरच संधी मिळते,” अशी भावना आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
नव्या महापालिका सभागृहात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महायुतीला आगामी काळात जोरदार विरोधाला सामोरे जावे लागणार, हे निश्चित आहे. काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने हल्ले चढवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आक्रमक आणि अनुभवसंपन्न चेहरा महापौरपदी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते, हा केवळ एक भाग आहे. प्रत्यक्षात भाजपमधील गटबाजीचे संतुलन राखणे, महाडिक गटाला समाधानी ठेवणे आणि दक्षिण कोल्हापूरच्या राजकारणात आपली पकड वाढवणे, हेच या निर्णयामागचे प्रमुख सूत्र ठरले आहे.
रुपाराणी निकम यांची महापौरपदी निवड ही भाजपसाठी केवळ पदवाटपाचा निर्णय नाही, तर ती एक राजकीय संदेश देणारी घटना ठरली आहे. एकीकडे महाडिक गटाचे वाढते वर्चस्व अधोरेखित झाले, तर दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. हा असंतोष कितपत वाढतो, तो संघटनात्मक पातळीवर कसा हाताळला जातो आणि त्याचे पडसाद आगामी निवडणुकांवर कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी कोल्हापूर भाजपमध्ये “महापौरपद कोणाला मिळाले” यापेक्षा “कुणाला डावलण्यात आले” याचीच चर्चा अधिक रंगताना दिसत आहे.