Kolhapur / Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील जागावाटपावरून सतेज पाटील यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; ‘भाजपचा अजेंडा मित्रपक्ष संपवण्याचाच’

Kolhapur / Ichalkaranji – इचलकरंजी महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात आलेल्या जागांवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील ( Satej Patil )यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “इचलकरंजीत शिंदे शिवसेनेला मताधिक्य मिळूनही ते आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. याउलट काँग्रेसने किमान आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे,” असे म्हणत त्यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले. भाजपचा एकमेव अजेंडा स्वतः शिंदे शिवसेना असो किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी असो, या मित्रपक्षांना कमकुवत करण्याचाच आहे, आणि त्याची प्रचिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, भाजपची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी एक नेता एक वक्तव्य करतो, तर दुसरा नेता त्याचे खंडन करतो. यामुळे माध्यमांचे लक्ष कायम भाजपकडे राहते आणि दोन्ही बाजूंच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मराठा समाजाचे आंदोलन असो वा ओबीसी समाजाचे आंदोलन, सरकारचा प्लॅन ठरलेलाच असतो – एकाने एका बाजूने बोलायचे, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने बोलायचे, आणि अखेरीस दोन्ही घटकांनी मतदान करताना आपल्यालाच मतदान करावे, असा डाव भाजप खेळतो, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

मुंबई महापालिकेबाबत बोलताना त्यांनी ठाम दावा केला की, “मुंबईमध्ये या सगळ्या राजकारणाचा फारसा परिणाम होणार नाही. मुंबईत मराठी माणूसच महापौर होईल.” भाजप कितीही राजकीय खेळी खेळत असला तरी मुंबईतील जनतेची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, काँग्रेसकडून विकासाचा स्पष्ट रोडमॅप तयार केला जात आहे. “हा माझा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, असे सांगत आम्ही जाहीरनामा तयार करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोल्हापूरकरांनी सांगावे, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. प्रशासकाच्या माध्यमातून गेली तीन वर्षे महानगरपालिकेवर सरकारची सत्ता आहे. या काळात नेमके काय झाले, कोल्हापूरची धूळधाण कशी झाली, हे जनतेने पाहिले आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेस टीकेपेक्षा सकारात्मक मुद्द्यांवर पुढील पंधरा दिवस जनतेसमोर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की, राज्यात केवळ नऊ ठिकाणीच महायुती झाली आहे, तीही जिथे प्रबळ विरोधक आहेत तिथे. “ज्या ठिकाणी विरोधक मजबूत आहेत, तिथे हातात हात घातल्याशिवाय यांना पर्याय नाही. स्वतंत्रपणे लढण्याचे धाडस त्यांच्यात नाही. चंद्रपूर असो किंवा कोल्हापूर, जिथे ताकद मोठी आहे तिथे ते एकटे लढत नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसने ४८ सक्षम उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली असून, दुसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. याउलट महायुतीमध्ये उमेदवार जाहीर करण्यात उशीर होत असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांवरच विश्वास नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

वीजदरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आवास्तव वीजदर मागे घेण्याबाबत NERC ने सूचना दिल्या होत्या, मात्र सरकारने त्या बदलून पुन्हा दरवाढ केली. हा विषय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेला, तेव्हा तो थांबला; पण आता पुन्हा नागपूर, पुणे, नवी मुंबई आणि मुंबई येथे विभागीय आयुक्तांकडे हेरिंग सुरू झाली आहे. “महाराष्ट्रातील जनतेने या हेरिंगला उपस्थित राहून प्रस्तावित वीजदरवाढीला विरोध करावा,” असे आवाहन करत ८ तारखेला पुण्यात होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या हेरिंगला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

MPSC च्या प्रश्नावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जाहिराती उशिरा निघाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वय अडचणीत येत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. “चार तारखेची परीक्षा पुढे ढकलावी,” अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून दबाव आणला जात असून, सोशल मीडियावरील मेसेज डिलीट करायला लावणे, मोबाईल तपासणे, चॅट डिलीट करणे, हे प्रकार हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा गंभीर आरोपही सतेज पाटील यांनी यावेळी केला.

Leave a Comment