Kolhapur | 15 दिवसांचा संघर्ष संपला; कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती एकत्र

Kolhapur | कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर महायुतीचा अंतिम फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने कालचा रविवार हा महायुतीसाठी ‘मॅरेथॉन बैठकींचा दिवस’ ठरला.

काल दिवसभर शिरोली, कोल्हापूर जिल्हा बँक परिसर आणि महाडिक पेट्रोल पंप परिसरात बैठकींचा धडाका सुरू होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल सात तास चाललेल्या बैठकींमध्ये जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी कसोशीने प्रयत्न केले. अखेर महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच एकत्र लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच जागावाटपावरून मतभेद होते. भाजपकडून 35, शिवसेनेकडून 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 20 जागांचा दावा करण्यात आला होता. तिन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने अनेक दिवस हा गुंता कायम राहिला होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, कालच्या बैठकीनंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भाजपला 35, शिवसेनेला 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेतील एकूण 81 जागांपैकी 79 जागांवर महायुतीतील सर्व घटक पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र उर्वरित दोन जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप रस्सीखेच सुरू आहे. या दोन जागांवर आज सकाळी 11 वाजेपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दुपारी 12 वाजेपर्यंत अधिकृत जागावाटपाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठक झाली. विशेष म्हणजे उर्वरित दोन वादग्रस्त जागांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यातूनही लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महायुतीमध्ये जनसुराज्य राज्य शक्ती या पक्षालाही सामावून घेण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विनय कोरे यांच्यासह संबंधित नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर जनसुराज्यचा सहभाग निश्चित झाला, तर महायुतीची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, विजय जाधव, महेश जाधव, शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. एकंदरीतच कोल्हापूरच्या राजकारणातील महायुतीचा तिढा सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आला असून, आज होणाऱ्या बैठकीनंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment