Election News Top 6 | महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले; ठाकरे–भाजप संघर्ष, राष्ट्रवादीतील फूट आणि स्थानिक निवडणुकांचा धडाका

Election News Top 6 | मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, आव्हाने आणि आक्रमक भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

1) अण्णामलाई–राज ठाकरे वादाने वातावरण तापले

भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. “मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले पाहिजे,” असे वक्तव्य अण्णामलाई यांनी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.
“एक रसमलाई तमिळनाडूतून आली आहे… तुझा इथे काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीका केली.यावर प्रत्युत्तर देताना अण्णामलाई यांनी थेट आव्हान दिले. “मी मुंबईत येणारच. मला कोणीही रोखू शकत नाही. हिंमत असेल तर माझे पाय कापून दाखवा,” असे विधान त्यांनी केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

2) मनसेकडून फडणवीसांवर हल्लाबोल

मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना थेट बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ दिला. “नाशिक महापालिकेत काही काळ वगळता कायम भाजपकडेच सत्ता होती. मग विकास का झाला नाही? पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब ठाकरे फडणवीसांना आशीर्वाद देतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचदरम्यान अमित ठाकरे यांच्या वक्तव्यानेही खळबळ उडाली. “दुबार मतदान करायला येणाऱ्यांना तिथेच झोडा,” असे आक्रमक आवाहन त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

3) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर पडदा

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परभणी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची आघाडी झाल्यानंतर पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. सुप्रिया सुळे इंडिया आघाडीत आहेत आणि आम्ही एनडीएमध्ये. त्यामुळे त्या केंद्रात मंत्री होणार नाहीत,” असे स्पष्ट विधान अजित पवार यांनी केले.

4) भाजपवर ‘काँग्रेस झाली’ असा आरोप

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना, “भाजपची काँग्रेस झाली आहे,” असा आरोप केला. भाजपच्या ६५ उमेदवारांपैकी ४५ उमेदवार हे काँग्रेसमधून आलेले असल्याचा दावा त्यांनी केला. “मूळ भाजपला केवळ १७ ते १८ जागा मिळाल्या आहेत,” असे सांगत त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले.

5) जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा

राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

  • उमेदवारी अर्ज : १६ ते २१ जानेवारी
  • छाननी : २२ जानेवारी
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २७ जानेवारी
  • मतदान : ५ फेब्रुवारी
  • मतमोजणी : ७ फेब्रुवारी

या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

6) प्रचाराचा आज शेवटचा दिवस

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात रॅली, रोड शो आणि सभांचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दुचाकीवर रोड शो करताना दिसले, तर उद्धव ठाकरे मुंबईत शाखाभेटींवर भर देत आहेत. एकूणच, निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे तापले असून मतदानाच्या दिवशी कोणाच्या पारड्यात सत्ता जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment