Devendra Fadanvis Maratha Reservation | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पानभर जाहिरात आणि मराठा आरक्षणाचा राजकीय संदेश

Devendra Fadanvis Maratha Reservation | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून धगधगत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारला शेवटी निर्णय घ्यावा लागला आणि जीआर काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील पात्रांना दाखले देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या घडामोडींना जरांगे यांनी “मागील 75 वर्षांतील सर्वात मोठा विजय” असे संबोधले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत भाजप नेते आणि मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करून त्यांना या प्रश्नाच्या तोडग्याचे श्रेय देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी (६ सप्टेंबर) महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रांत एक पानभर जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करताना दिसत आहेत. सोबतच शिवाजी महाराजांची राजमुद्राही दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत कोणत्याही संस्थेचे किंवा व्यक्तीचे नाव नसून फक्त “देवाभाऊ” असा उल्लेख आहे. जाहिरात कोणाकडून दिली याचा कोणताही ठसा नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या जाहिरातीचा थेट मराठा आरक्षणाशी संबंध जोडलेला नसला तरी तो सूचक संदेश देत असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत. कारण, फडणवीस यांनीच हा प्रश्न सोडवला असा सूर भाजप नेत्यांकडून लावला जात आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर तातडीने जीआर काढण्यात आला आणि सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यामध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे सांगून जाहिरातीद्वारे त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय हा सरकारचा सामूहिक निर्णय असला तरी भाजप नेत्यांनी श्रेय फडणवीस यांना द्यायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी हा निर्णय मराठा समाजाच्या आंदोलनाचा विजय असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा विजय खरंच समाजाचा की सरकारचा, की फडणवीस यांचा, या चर्चेला उधाण आले आहे. राजकीय पातळीवर मात्र फडणवीस यांची प्रतिमा ‘समस्या सोडवणारा नेता’ म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मराठा समाजाला दिलेल्या या नवीन आरक्षण प्रक्रियेवरून ओबीसी समाजात नाराजी व्यक्त होत आहे. ओबीसी नेत्यांचा आरोप आहे की, मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. मात्र, फडणवीस यांनी या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ओबीसींच्या हक्कावर कुठलाही गदा आणला जाणार नाही. फक्त पात्र असणाऱ्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल. त्यामुळे ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण कमी होणार नाही.

जाहिरातीत मराठा आरक्षणाचा कुठेही थेट उल्लेख नसल्याने हा मुद्दा टाळण्यात आल्याचे दिसते. यामागील उद्दिष्ट ओबीसी समाजाच्या नाराजीला अधिक खतपाणी न घालणे हे असल्याचे चर्चेत आहे. फडणवीस यांच्या प्रतिमेला मराठ्यांचा आधार मिळावा आणि ओबीसींचा रोष टाळावा, अशी राजकीय रणनीती यामागे असल्याचे विश्लेषक मानतात.

Leave a Comment