Chief Justice Bhushan Gavai Nagpur Visit | मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या नागपूर भेटीत प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

Chief Justice Bhushan Gavai Nagpur Visit | सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे आज प्रथमच नागपूर दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर राज्य प्रशासनातील जवळपास सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईत झालेल्या गोंधळानंतर आणि मुख्य न्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या सूचक नाराजीच्या पार्श्वभूमीवर, नागपूरमध्ये यावेळी प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करण्यात आले.

मुंबईत काही दिवसांपूर्वी गवई यांच्या आगमनावेळी एकही वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचा मोठा मुद्दा निर्माण झाला होता. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी सार्वजनिक कार्यक्रमात सूचक प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, “मी प्रोटोकॉलच्या बाबतीत आग्रह धरत नाही. पण माझ्या जागी कोणी दुसरा असता तर राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ चा वापर केला असता.” यावरून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशाराच दिला होता.

हा विषय सार्वजनिक क्षेत्रात गाजल्यावर विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र चालवले. काही राजकीय पक्षांनी यास राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला. मात्र स्वतः सरन्यायाधीश गवई यांनीच या वादाला पूर्णविराम देत, “हा मुद्दा आता बंद झाला पाहिजे,” असे ठणकावून सांगितले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे ‘कायमस्वरूपी राज्य अतिथी’ असतील, अशी अधिकृत घोषणा केली. तसेच त्यांच्या स्वागतासाठी कोणत्या दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार, याबाबत स्पष्ट आदेश जारी करण्यात आले. त्यासोबतच व्हीआयपी प्रोटोकॉल संदर्भात समन्वय राखणारा एक विशेष अधिकारी नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला.

या आदेशांची अंमलबजावणी नागपूर विमानतळावर आज प्रत्यक्षात दिसून आली. न्यायमूर्ती गवई यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर हे न्यायमंडळातील प्रमुख प्रतिनिधी होते.

प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षलविरोधी अभियान), विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातून राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबाळकर यांनी देखील गवई यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे नागपूर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे यांनी न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार केला.

या स्वागत सोहळ्याचा उद्देश केवळ औपचारिकता पूर्ण करणे नव्हता, तर न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्यक्तीप्रती राज्य शासनाचा सन्मान व्यक्त करण्याचा होता. नागपूरमधील आजचा सोहळा प्रोटोकॉलचे पालन कसे करावे याचे आदर्श उदाहरण ठरले.

या निमित्ताने न्यायप्रणाली व कार्यकारी यंत्रणेमध्ये असलेल्या परस्पर सन्मान व सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे प्रशासन सजग झाले असून भविष्यात अशा संवेदनशील प्रोटोकॉल बाबतीत गाफील राहणार नाही, याची खात्रीही मिळाली आहे.

Leave a Comment