Atul Londhe | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या कथित ‘मॅचफिक्सिंग’ प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत निवडणूक आयोगाच्या वतीने भाजपचे नेतेच प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप केला. त्यांनी थेट विचारलं – “भाजपचे नेते आयोगाचे प्रवक्ते केव्हा झाले?”
काँग्रेसच्या शंका आणि याचिका
अतुल लोंढे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. काँग्रेसचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले असून, त्यामागे निवडणूक प्रक्रियेतील अपारदर्शकता असल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील तब्बल २७ पराभूत उमेदवारांनी निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, व्हीव्हीपॅट आणि संबंधित निवडणूक दस्तऐवजांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध लढणारे प्रफुल गुडधे यांचाही समावेश आहे.
“ज्यांना प्रश्न विचारले नाही, तेच उत्तरे का देतात?”
लोंढेंनी भाजप नेत्यांवर टीका करताना म्हटले की, “आम्ही आयोगाला प्रश्न विचारतो, पण उत्तरे भाजपकडून येतात. याचा अर्थ स्पष्ट आहे – चोराच्या मनात चांदणे आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, जर आयोगाला आमचे आरोप खोटे वाटत असतील, तर त्यांनी पुरावे सादर करावेत. लेखी उत्तरं द्यावीत आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे. तसे केल्यास सत्य काय आहे, ते लोकांसमोर स्पष्ट होईल.
हरियाणातील कोर्ट निर्णय आणि नवा वाद
हरियाणातील निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अचानक नियमांमध्ये बदल करण्यात आले आणि आयोगाला निवडणूकसंबंधित डेटा ४५ दिवसांत नष्ट करण्याचे अधिकार मिळाले. यामुळेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शंका आणखी बळावल्या आहेत.
मतदारसंख्या वाढीवरही शंका
लोंढेंनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील प्रचंड वाढीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, राज्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा सज्ञान मतदारांची संख्या कशी काय वाढली? एका मतदार नोंदणीला सरासरी ३ मिनिटे लागतात. ती प्रक्रिया एक मिनिट धरली तरी लाखो मतदारांची नोंदणी ५ महिन्यात शक्यच नाही. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत मतदार यादीच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकशाहीसाठी लढा
लोंढेंनी स्पष्ट केलं की, “आमचा संघर्ष हा भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध नाही. आमचा लढा आहे तो लोकशाहीसाठी. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. निवडणूक आयोगाने योग्य खुलासे करावेत. जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेबाबत शंका राहतील, तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहणार.”
भाजपवर दिशाभूल करण्याचा आरोप
कोंग्रेस प्रवक्त्यांनी सरकारवर आणि भाजपवर मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आरोपही केला. लोंढे म्हणाले की, “आम्ही ज्या मतदारसंघाबद्दल माहिती मागतो, तिथली माहिती न देता इतर ठिकाणची माहिती दिली जाते. या सगळ्या प्रकाराचा उद्देश नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि खरे चित्र लपवणे हाच आहे.”