Air India Flight Crash | अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील एक दांपत्यही मृत्युमुखी पडले. महादेव तुकाराम पवार (वय ६८) आणि आशा महादेव पवार (वय ६०, सध्या राहणार नडियाद, गुजरात; मूळ रहिवासी हातीद, सांगोला, सोलापूर) असे या दुर्दैवी दांपत्याचे नाव आहे. या दुर्घटनेत एकूण २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, केवळ एका प्रवाशाला जीवदान मिळाले आहे.
महादेव आणि आशा पवार हे आपल्या लंडनमधील मुलाच्या व्यवसायाचा आढावा घेण्यासाठी इंग्लंडला जाणार होते. मात्र त्यांच्या आयुष्यात ही संधी येण्यापूर्वीच काळाने झडप घातली. त्यांनी याआधी दोन वेळा इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न केला होता – एकदा वर्षभरापूर्वी आणि दुसऱ्यांदा सहा महिन्यांपूर्वी. परंतु तिकीट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे त्या दोन्ही प्रयत्नांना अपयश आले. शेवटी यावेळी सर्व काही सुरळीत असल्याचे वाटले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.
एअर इंडियाचे हे विमान दुपारी अहमदाबादहून लंडनकडे रवाना झाले होते. मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच विमान कोसळले. अपघात इतका भीषण होता की, विमानाचे तुकडे दूरदूरपर्यंत विखुरले गेले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
महादेव पवार हे निवृत्त शासकीय कर्मचारी होते. निवृत्तीनंतर ते पत्नी आशा पवार यांच्यासह गुजरातमधील नडियाद येथे स्थायिक झाले होते. दोघेही आपल्या मुलाकडे इंग्लंडमध्ये जाऊन काही काळ राहण्याचा मानस बाळगून होते. मुलाच्या स्थायिक व्यवसायामध्ये त्यांची मदत व्हावी, हीच त्यांची इच्छा होती. पण हीच इच्छा त्यांच्या अखेरच्या प्रवासाचे कारण बनली.
हातीद गावात पवार कुटुंबाच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल आपली सहवेदना व्यक्त केली असून गावातील अनेकांनी “चांगले, शांत स्वभावाचे, कष्टकरी आणि कुटुंबवत्सल” अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या अपघातानंतर केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या तांत्रिक पथकासह नागरी उड्डाण मंत्रालयाकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून, विमान कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाड ही शक्यता वर्तवली जात आहे.
पवार दाम्पत्याच्या निधनाने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे. ज्या नजरेने त्यांनी मुलाच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न आयुष्याच्या अंतिम टप्प्यात जिथे पूर्णत्वाला जायला हवे होते, तिथेच अर्धवट राहिले.
हा अपघात केवळ एका कुटुंबाची नव्हे तर शेकडो कुटुंबांची आघातकारक शोककथा ठरली आहे. आणि यातून पुन्हा एकदा हवाई सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.