Maharashtra News | 31 जानेवारी 2026 च्या टॉप 10 राजकीय बातम्या

Maharashtra News | महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये आज त्यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह राज्यातील महापालिका, पक्षांतर्गत हालचाली, विलिनीकरणाच्या चर्चा आणि सत्तासंघर्ष यांमुळे आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला. जाणून घ्या आजच्या ‘टॉप 10’ राजकीय बातम्या सविस्तरपणे


1) सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

अजित पवार ( Maharashtra News )यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आज त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. राजभवनातील लोकभवनात सायंकाळी ५ वाजता झालेल्या शपथविधीत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

2) राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड

शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. परिणामी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध गटनेतेपदी निवड झाली.

3) सुनिल तटकरे यांची भावनिक प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “अत्यंत दु:खाच्या प्रसंगात सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली. जनतेची आणि आमदारांची तीच इच्छा होती.” त्यांच्या वक्तव्याने पक्षातील भावना स्पष्ट झाल्या.

4) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? चर्चांना वेग

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर चर्चा पुन्हा वेगाने सुरू झाल्या आहेत. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी विलिनीकरणाचा अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावा, अशी भूमिका मांडली.

5) शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, “१२ तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती. पण अजित पवार यांच्या निधनामुळे मोठा आघात झाला.” त्यांनी अजित पवारांची काम करण्याची पद्धत पुढे सुरू ठेवण्याचा विश्वासही व्यक्त केला.

6) पुणेकरांवर १० टक्के करवाढीचा प्रस्ताव

पुणे महापालिकेच्या मिळकतकरात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. उत्पन्न वाढत नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. अंतिम निर्णय २० फेब्रुवारीपूर्वी मुख्यसभेत होणार आहे.

7) चंद्रपूर महापालिकेत ठाकरे सेनेची रोखठोक भूमिका

चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरे गटाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. “जो महापौरपद देईल, त्याच्यासोबत जाणार,” असं जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सांगितलं. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत.

8) भिवंडी महापालिकेत सत्तासंघर्ष तीव्र

भिवंडी महापालिकेत समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय समीकरण बिघडले आहे. ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चा बहुमताचा दावा अडचणीत आला असून सत्ता स्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

9) पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने प्रशांत शितोळे यांची गटनेतेपदी निवड केली. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या शितोळेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

10) राज्यभर अजित पवारांना श्रद्धांजली

नांदेड, धुळे यांसह अनेक ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आल्या. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवस बंद ठेवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Comment