Breaking News | 1) शेतकरी लॉन्ग मार्चच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची हमी
नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या शेतकरी लॉन्ग मार्चच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, समुद्रात वाहून जाणारे पाणी कोरडवाहू भागात वळवणे, पेसा भरती सुरू करून रोजगारनिर्मिती, गायरान व वनजमिनींचे स्वतंत्र सातबारा देणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व आदिवासी प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून सन्मानजनक तोडगा काढण्याची हमी दिली आहे. दोन तास चाललेल्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
2) महाजनांच्या भाषणावरून वाद; जोगेंद्र कवाडेंना विरोध
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांच्या भेटीसाठी आलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांना विरोधाचा सामना करावा लागला.
भाजप सत्तेत असल्याने कवाडेंचा पाठिंबा नको, अशी भूमिका काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी घेतली. मात्र, संविधानासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार, अशी भूमिका मांडत कवाडेंनी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि महाजनांनी लेखी माफी मागावी, अशी मागणी केली.
3) पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. महाजनांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली असून पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
4) जितेंद्र आव्हाडांचा मुंब्र्यात नागरी सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज मुंब्रा भागात जाहीर नागरी सत्कार व भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
निवडणुकीनंतर प्रथमच आव्हाड मुंब्रा परिसरात शक्तिप्रदर्शन करणार असून, सभेत ते काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. MIM चे पाच नगरसेवक निवडून आल्यानंतर आव्हाडांवर टीका झाली होती.
5) पुणे महापौर निवडीचा मुहूर्त ठरला
पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवड होणार असल्याची माहिती आहे. आज नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होत असून, गटनेत्याची निवड आजच होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, ऐश्वर्या पठारे, रत्नमाला सातव आणि मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत आहेत.
6) मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर?
भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी पूर्ण न झाल्यामुळे मुंबई महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
गटनोंदणी झाल्यानंतरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
7) मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील दोन्ही विमानतळ मेट्रोद्वारे जोडले जाणार असल्याची घोषणा केली. ३३ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पापैकी ९ किमी भुयारी मार्ग असेल. यासाठी १७ ते १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
8) चंद्रपुरात भाजपचाच महापौर – बावनकुळे
राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे बहुमत असल्याने भाजपचाच महापौर होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
9) चंद्रपूर सत्तास्थापनेबाबत विजय वडेट्टीवार–उद्धव ठाकरे भेट
चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अडीच वर्षांचा सत्ता-वाटपाचा फॉर्म्युला, महापौर, उपमहापौर व स्थायी समिती पदांवर चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
10) बारामतीत नगराध्यक्षांवर शाईफेक
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याच्या निषेधार्थ बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून निषेधाच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.