Today’s News | महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक घडामोडींनी खळबळ उडवली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली, तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप–प्रत्यारोप, कारवाया आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.
1) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार
केंद्र सरकारने 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. 2019 ते 2023 या काळात कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण राहिले होते. तरीही केंद्र सरकारने त्यांना दिलेल्या सन्मानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
2) महाराष्ट्रातील 4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार
महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनाट्य व तमाशा क्षेत्रातील रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड, वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि सामाजिक कार्यकर्त्या आर्मिंदा फर्नांडिस यांचा यात समावेश आहे. विविध क्षेत्रांतील योगदानाची केंद्र सरकारने दखल घेतल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
3) कोल्हापूर ZP निवडणूक : साड्यांचा टेम्पो पकडला
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. महिला मतदारांना आमिष दाखवण्यासाठी साड्यांचे वाटप केले जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. साड्यांच्या पिशव्यांमध्ये थेट उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स आढळल्याने हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
4) लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या अपहरणाचा संशय
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानंतर त्या घरी परतल्या नाहीत. जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ उडाली आहे.
5) धाराशिवमध्ये शिवसेना-भाजप संघर्ष उफाळला
धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुलाने शिवसेनेचे एबी फॉर्म वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांना घेराव घातला. मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
6) पुण्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
पुण्यातील काशेवाडी परिसरात भाजपच्या दोन नगरसेविकांच्या समर्थकांमध्ये फ्लेक्स आणि बॅनर लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली. लोखंडी पाईप आणि बांबूचा वापर झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
7) नांदेडमध्ये मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमधील “हिंद दी चादर” या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणही उपस्थित होते.
8) वरुण सरदेसाईंचा मनसेवर अप्रत्यक्ष हल्ला
मनसेने एकनाथ शिंदेंसोबत जाण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
9) राज ठाकरे पुणे मनसेत फेरबदल करणार
पुणे महापालिकेत मनसेला एकही जागा न मिळाल्याने राज ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदलांचे संकेत दिले आहेत. पुणे मनसेची ‘भाकरी फिरवली जाणार’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
10) नांदेडमध्ये भाजप–शिवसेना जवळीक
नांदेड महापालिकेत भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.