Pune Zilla Parishad Elections | पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता आता थेट राज्याच्या राजकारणाची नाडी तपासणाऱ्या ‘मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुका ठरत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्याकडे विशेष लक्ष लागले आहे. त्याला कारण म्हणजे या निवडणुकीत थेट बड्या नेत्यांचे वारसदार मैदानात उतरले असून, ही लढत आता केवळ पक्षांची नव्हे तर राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.
पुणे जिल्हा ( Pune Zilla Parishad Elections ) परिषदेत 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून वातावरण चांगलेच तापले आहे. या सगळ्यात नेतेमंडळींनी स्वतः मैदानात उतरण्याऐवजी कुटुंबातील नातलगांना संधी दिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक ही आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची रंगीत तालीम ठरणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
इंदापूर तालुक्यातील लढती विशेष चर्चेत आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच आपले चिरंजीव श्रीराज भरणे यांना राजकारणात उतरवले आहे. बोरी पंचायत समितीच्या गणातून श्रीराज भरणे निवडणूक लढवत असून, भरणे कुटुंबासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे इंदापूरच्या राजकारणात दीर्घकाळ वैर असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील आपल्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्यासाठी मैदानात सक्रिय झाले आहेत.
अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरल्या असून त्यांनी बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या निवडणुकीत त्या याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. अंकिता यांचा विवाह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे. त्यामुळे पाटील आणि ठाकरे ही दोन प्रभावशाली राजकीय घराणी या लढतीत आमनेसामने येत असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विशेष बाब म्हणजे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूरच्या राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र, मुलगा आणि मुलीच्या राजकीय भविष्यासाठी हे दोन्ही नेते वैर विसरून एकत्र आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समन्वय असल्याने भरणे आणि पाटील यांचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रंजक बनली आहे.
भोर तालुक्यातही प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असून, नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर ही निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाची संधी मानली जात आहे. भोरमध्ये अनेक वर्षे थोपटे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती, मात्र सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने येथे सत्ता काबीज केली आहे.
शिरूर तालुक्यातही नातलगांची लढत चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून टाकळी हाजी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या गावडे कुटुंबाची ही निवडणूकही प्रतिष्ठेची ठरली आहे.
एकूणच पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या केवळ स्थानिक प्रश्नांपुरत्या मर्यादित न राहता, बड्या नेत्यांच्या वारसदारांची राजकीय चाचणी ठरत आहेत. या निकालातून कोणत्या घराण्याची पकड मजबूत आहे आणि आगामी काळात कोणते नेतृत्व पुढे येणार, याचे स्पष्ट संकेत मिळणार असल्याने पुण्याचा हा ‘मिनी मंत्रालयाचा’ आखाडा खऱ्या अर्थाने राजकीय जॅकपॉट ठरणार आहे.