Maharashtra Update | राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पक्षांतर्गत हालचालींमुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या प्रचंड गाजलेला ठरला. महापौरपदाचे तिढे, युती-अनुती, बंडखोरी, आरोप-प्रत्यारोप आणि विकास-घोषणांचा धडाका – अशा अनेक घडामोडींनी राज्याचं राजकारण तापलं. आजच्या Top 10 News सविस्तरपणे पाहूया
1) संभाजीनगर महापालिकेत सभागृह सुरू होण्याआधीच वाद
Maharashtra Update | दहा वर्षांनंतर झालेल्या निवडणुकांनंतर नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहात येण्यापूर्वीच तक्रारींच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही नगरसेवकांना तिसऱ्या अपत्याचा मुद्दा अडचणीत आणत असून विरोधकांनी त्यांच्याविरोधात अधिकृत तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पहिल्याच सत्राआधी वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
2) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेना–भाजप युती
महापालिकेत स्वतंत्र लढल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी मात्र भाजप-शिवसेनेत युती झाली आहे. 63 पैकी 52 जागांवर एकमत झाले असून भाजप 27, शिवसेना 25 जागांवर लढणार आहे. उर्वरित 11 जागांचा निर्णय राज्य पातळीवर सोपवण्यात आला आहे.
3) अकोला – भाजप उमेदवाराला काँग्रेसचा सूचक, AIMIMचा अनुमोदक
हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवार अनिता वाकोडे यांच्या अर्जावर काँग्रेस सूचक आणि AIMIM अनुमोदक असल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या ‘अनपेक्षित’ समीकरणामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
4) मीरा-भाईंदर महापौरपदावर मराठी एकीकरण समिती आक्रमक
मराठीच महापौर हवा, अशी ठाम भूमिका घेत समितीने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोवर्धन देशमुख यांनी थेट भाषेत इशारा देत राजकीय वातावरण तापवले आहे.
5) ठाकरेंचे नगरसेवक संपर्काबाहेर – खळबळ
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे आणखी दोन नगरसेवक संपर्काबाहेर गेल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. पक्ष नेतृत्वाने कारवाईचे संकेत दिले आहेत.
6) अकोल्यात भाजपकडून ठाकरे सेनेला ‘ऑफर’
महापौर निवडीसाठी भाजपने ठाकरे गटाला पाठिंब्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापती पदाची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. काँग्रेसही सत्तेसाठी सर्व पर्याय तपासत आहे.
7) EVM विरोधात निवडणूक आयोग कार्यालयात गोंधळ
जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मुंबईतील राज्य निवडणूक आयोग कार्यालयात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
8) पुणे महापालिकेचं बजेट 30 जानेवारीपर्यंत
PMC चं 2026-27 आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक 30 जानेवारीपर्यंत सादर होणार असून रस्ते, पाणी, स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे.
9) मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा – 15 लाख नोकऱ्या
दावोस येथे 14.5 लाख कोटींचे 19 सामंजस्य करार झाले असून राज्यात सुमारे 15 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
10) राज-उद्धव ठाकरे 23 जानेवारीला एकत्र
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.