Kolhapur Election News | कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने संख्याबळाच्या जोरावर सत्ता मिळवली असली, तरी राजकीय आणि नैतिक पातळीवर काँग्रेसने मोठा विजय मिळवला असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ८१ पैकी तब्बल ३४ जागांवर विजय मिळवत कोल्हापूरमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एकीकडे भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ताधारी महायुती, तर दुसरीकडे जवळपास एकाकी लढत देणारी काँग्रेस – अशा असमान लढतीत सतेज पाटील यांनी महायुतीतील दिग्गज नेत्यांनाच घायकुतीला आणल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच महायुतीने एकजुटीचा मोठा दावा केला होता. भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत कोल्हापुरात सत्ता मिळवण्याचा निर्धार करण्यात आला. दुसरीकडे महाविकास आघाडीमधून केवळ काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मात्र जागावाटपात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ७५ जागांवर उमेदवार उभे केले, तर ठाकरे शिवसेना केवळ पाच जागांवर लढली. अपेक्षित जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत तिसरी आघाडी स्थापन केली. याचा थेट फायदा काँग्रेसला झाल्याचे निकालातून दिसून आले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या सर्वच नेत्यांनी विकास कामांपेक्षा आमदार सतेज पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. थेट पाईपलाईन, रस्ते, पाणीपुरवठा अशा मुद्द्यांवरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांनी सतेज पाटील यांच्यावर चौफेर आरोप केले. मात्र या टीकेचा काँग्रेसवर फारसा परिणाम झाला नाही. उलट सतेज पाटील यांनी शांत आणि संघटित रणनीतीच्या जोरावर महायुतीला पुरून उरल्याचे स्पष्ट झाले.
या निवडणुकीत ‘हात’ या एकाच चिन्हाचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. ७५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार असल्याने प्रत्येक प्रभागात ईव्हीएमवर केवळ काँग्रेसचे चिन्ह दिसत होते. त्यामुळे प्रचार करताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला नाही. याउलट महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने वेगवेगळ्या चिन्हांचा प्रचार करावा लागला आणि त्याचा फटका महायुतीला बसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
उमेदवार निवड, प्रचाराचे नियोजन, बैठका, सभा ते मतमोजणीपर्यंत सर्व सूत्रे सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयातूनच हलवली गेली. एकमुखी निर्णयप्रक्रिया, स्थानिक व अनुभवी उमेदवारांना संधी आणि नव्या चेहऱ्यांमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्याची रणनीती यशस्वी ठरली.
महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. मात्र शिंदे यांचा रोडशो आणि मर्यादित सभा फारसा प्रभाव पाडू शकल्या नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यापेक्षा खासदारांच्या चिरंजीवांचे प्रमोशन अधिक झाल्याची चर्चा रंगली, ज्याचा थेट फायदा भाजपला अपेक्षित तसा मिळाला नाही.
अखेरीस, संख्याबळाच्या जोरावर महायुती सत्तेत असली तरी पक्षीय पातळीवर काँग्रेस ३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांचे वजन वाढले असून, आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला या निकालातून मोठे बळ मिळाले आहे. महायुतीला मात्र नव्याने रणनीती आखावी लागणार, हे या निकालाने स्पष्ट केले आहे.