Top 10 Maharashtra Political News | मतदानाच्या आधी राज्यात खळबळ; राडे, आरोप-प्रत्यारोप आणि मोठ्या घडामोडी

Top 10 Maharashtra Political News | 1) संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी राडा

छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यात दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.


2) पनवेलमध्ये पैसे वाटपाचा आरोप

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजप कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी याबाबत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली असून निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा मुद्दा गंभीर बनला आहे.


3) घणसोलीत भाजप-शिवसेना (शिंदे) हाणामारी

नवी मुंबईतील घणसोली परिसरात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पहाटेच्या सुमारास हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


4) कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादी पवार गटात गोंधळ

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाच्या काही तास आधी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रचंड गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. उमेदवारी असूनही उबाठा उमेदवाराला पाठिंबा असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कार्यकर्ते आणि उमेदवार संभ्रमात सापडले आहेत.


5) खारघरमध्ये पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या

खारघर सेक्टर २० परिसरात पैशांनी भरलेल्या संशयास्पद बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे पैसे कोणत्या पक्षाचे आहेत, याबाबत तपास सुरू आहे. मतदारांना पैसे वाटपाच्या संशयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


6) धुळ्यात शिवसेना उमेदवाराच्या घरावर हल्ला

धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या आधीच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. भाजप उमेदवार व गुंडांकडून दहशत निर्माण केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.


7) धुळ्यात ५०० मतदान कार्डांचा साठा सापडला

धुळ्यात देवपूर परिसरात एका कार्यकर्त्याकडे ५०० हून अधिक मतदान कार्ड सापडल्याने मोठी खळबळ उडाली. एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही सर्व मतदान कार्ड निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.


8) नाना पटोलेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

वाशिममध्ये एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हा अन्नदात्याचा अपमान असून फडणवीस सरकार शेतकरीविरोधी आहे,” अशी टीका त्यांनी केली.


9) उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

उद्धव ठाकरे यांनी “ही निवडणूक गद्दार आणि भ्रष्ट प्रवृत्तीविरोधात आहे” असे म्हणत शिवसैनिकांना मशालीला मतदान करण्याचे आवाहन केले. मराठी अस्मिता आणि लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा त्यांनी दिला.


10) पुण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे महापालिका निवडणुकीसाठी १२,५०० पोलीस, ३,२५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Comment