Babanrao Lonikar | बबनराव लोणीकरांची जीभ पुन्हा घसरली; सोशल मीडियावरील टीकेवर संतापाचा विस्फोट, ग्रामस्थांना निधी रद्द करण्याची धमकी

Babanrao Lonikar | जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर काही व्यक्तींनी लोणीकरांवर टीका केल्यानंतर त्यांनी अक्षरशः आपले भान हरपल्यासारखा संताप व्यक्त केला. टीकाकारांवर टीका करताना त्यांनी अश्लील आणि व्यक्तिगत पातळीवरील शब्दांचा वापर केला असून, ‘कुचरवट्यावर बसून टवाळक्या करणाऱ्या’ व्यक्तींना उद्देशून त्यांच्या आई-वडिलांपासून ते बहीण-बायकोपर्यंतची उदाहरणे देत घणाघात केला.

सोशल मीडियावरील टीकेवरून तोंडसुख

बुधवारी परतूर मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, “कुचरवट्यावर बसून टवाळक्या करणाऱ्या दहा-बारा टाळक्यांना माहित नाही, त्यांच्या हातात जो मोबाईल आहे, तो सुद्धा सरकारच्या पैशातून आहे. तुझ्या बापाला पेरणीला मोदी सहा हजार रुपये देतात. तुझ्या मायची पेन्शन लोणीकरणं दिली. तुझ्या अंगावरचे कपडे, पायात बूटसुद्धा या सरकारच्या पैशातून आलेत. आमचचं खातात आणि आमच्यावरच उलटतात.”

त्यांचे हे वक्तव्य अवमानकारक आणि असंसदीय असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. टीका करणाऱ्यांची थेट कुटुंबीयांवर उतरून केलेली टिप्पणी ही लोकप्रतिनिधीच्या भूमिकेला शोभणारी नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

निधी रद्द करण्याची धमकी

याआधीही लोणीकरांनी परतूर तालुक्यातील काही गावांमध्ये मतदान कमी झाल्याबद्दल संताप व्यक्त करत, “ तुमच्या गावाचा निधी रद्द करू का?” असा सवाल ग्रामस्थांना केला होता. निवडणुकीत मतदानाचा टक्का अपेक्षेप्रमाणे न आल्यानं त्यांनी थेट विकासनिधी थांबवण्याची धमकी दिली. ही भूमिका लोकशाही विरोधी असून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

वारंवार वादग्रस्त विधानांची मालिका

ही पहिलीच वेळ नाही की लोणीकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यापूर्वीही विविध निवडणुकांदरम्यान आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त, कधीकधी अपमानास्पद भाषा वापरली आहे. सोशल मीडियावरील टीकेला सामोरं जाताना संयम बाळगण्याऐवजी, त्यांनी बारकाईने विचार न करता सार्वजनिकरित्या अश्लील आणि व्यक्तिगत शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या वक्तव्यांवर टीकेची झोड उठली आहे.

टीकाकारांची प्रतिक्रिया

लोणीकरांच्या या वर्तनावरून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. एका स्थानिक कार्यकर्त्याने लिहिले, “जनतेच्या मतावर निवडून आलेल्या आमदाराने जनतेलाच धमकावणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. निधी म्हणजे आमदाराच्या बापाची माळ नाही, तो लोकांचा हक्क आहे.”

तर काहींनी त्यांच्या शब्दप्रयोगाबद्दल निवडणूक आयोग आणि पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

पक्षश्रेष्ठींची भूमिका स्पष्ट नाही

या सगळ्या प्रकरणावर अद्याप भाजपच्या राज्य नेतृत्वाने कोणतंही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, लोकप्रतिनिधीच्या वर्तनाने पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे भाजपमधील काही सूत्रांकडूनही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment