Top 10 News | १. ठाकरे गटाच्या बॅनरबाजीने दिव्यात राजकीय तापमान वाढले
कल्याण लोकसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने दिव्यात जोरदार बॅनरबाजी केली. या बॅनरमध्ये मनसे नेते राजू पाटील यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले असून, यामधून शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या भागात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
२. युक्रेनचा ड्रोन हल्ला: रशियाचे ४ एअरबेस उद्ध्वस्त, ४० विमाने निष्क्रिय
रशिया-युक्रेन युद्ध नव्या टप्प्यात पोहोचले आहे. युक्रेनने केलेल्या जोरदार ड्रोन हल्ल्यात रशियाचे ओलेन्या, बेलाया या ठिकाणी असलेले चार एअरबेस लक्ष्य करण्यात आले. यामध्ये सुमारे ४० विमाने निष्क्रिय झाली असून हे युद्ध आणखी भडकेल, अशी शक्यता आहे.
३. नितेश राणे व ३० जणांची निर्दोष मुक्तता
२०१७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये मासे फेकण्याच्या आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यातून मंत्री नितेश राणे व ३० जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. प्रत्यक्षदर्शी कोणालाही मासे फेकताना दिसले नाही, या कारणावरून न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
४. पुण्यात जेसीबी व्यवहार फसवणूक प्रकरणात हगवणे कुटुंबीयांची यंत्रे जप्त
पुण्यात शशांक आणि लता हगवणे यांनी एका व्यावसायिकाची जेसीबी व्यवहारात फसवणूक केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पोलिसांनी त्यांची जेसीबी मशीन जप्त केली असून तपास पुढे सुरू आहे.
५. भावे हायस्कूलजवळ भीषण अपघात; तिघांना अटक, विद्यार्थ्यांचे हाल
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर भरधाव कार चढवण्यात आली. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असून कारचालक, सहकारी व कारमालक अशा तिघांना अटक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा संधी देण्याची विनंती केली आहे.
6. नाशिक कुंभमेळा: अमृतस्नानाच्या तारखा जाहीर
२०२६ ते २०२८ दरम्यान होणाऱ्या नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ४५-४६ अमृतस्नानांचे नियोजन निश्चित करण्यात आले.
७. अजित पवारांचा टोला : “माणिकराव कोकाटे अजून मनात गोष्टी ठेवायला शिकले नाहीत”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अलीकडील वक्तव्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी म्हटले, “सगळं बोलून दाखवायचं नसतं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात.” हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
८. बी.जे. मेडिकल कॉलेज रॅगिंग प्रकरण : ३ डॉक्टर निलंबित
पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणात तिघा निवासी डॉक्टरांवर सहा महिन्यांची निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांना कॉलेज व वसतिगृह प्रवेश बंदीचा आदेश देण्यात आला आहे.
९. नागालँडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोठा झटका
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सर्व सात आमदार सत्ताधारी NDPP पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे NDPP ची बहुमताकडे वाटचाल पूर्ण झाली असून अजित पवारांच्या गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे.
१०. पुणे पोलिसांचा मनमानी बंदोबस्त; नागरिक त्रस्त
पुण्यात वृक्षाथॉनसाठी सकाळी ४ वाजल्यापासून शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनमधील मुख्य रस्ते अचानक बंद करण्यात आले. पर्यायी मार्ग न दिल्यामुळे परीक्षार्थी, विमान प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी पोलिसांच्या मनमानीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.