Top 10 News Stories | 1. मोठा निर्णय : महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश – देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना स्थगिती
राज्य सरकारने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातून जारी परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरवले जाईपर्यंत कोणतीही देवस्थान इनाम मिळकत नोंदवता येणार नाही.
2. पोलीस दलात गोंधळ : गजा मारणे सोबत ढाब्यावर मटण पार्टी – 5 पोलीस निलंबित
गुंड गजा मारणेसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर मटण पार्टी केल्याची घटना समोर आली आहे. सांगली कारागृहात नेत असताना ही घटना घडली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
3. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानची खळबळजनक मागणी
बलोच नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा करत ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ची स्थापना जाहीर केली आहे. त्यांनी भारत सरकारकडे दिल्लीत बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे.
4. भारताला पाकिस्तानकडून सिंधू जल करारावर पुन्हा विचार करण्याची विनंती
सिंधू जल कराराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताला पुन्हा विचार करण्याचे पत्र पाठवले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे पाकिस्तानकडून ही विनंती करण्यात आली असून, जलशक्ती मंत्रालयाला हे पत्र पाठवण्यात आले आहे.
5. भारताचा चीनला दणका – ग्लोबल टाईम्सचे ट्विटर खाते भारतात बंद
भारत सरकारने चीनच्या सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे ट्विटर खाते भारतात बंद केले आहे. चिनी प्रोपगंडा पसरवण्याचा आरोप या खात्यावर असून, त्याच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
6. भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ – अमरावतीकरांचा जल्लोष
अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्यानंतर अमरावती शहरात फटाके आणि लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
7. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तांना जबाबदारी
राज्य सरकारने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अशा जोडप्यांच्या संरक्षणाची जबाबदारी थेट पोलिस आयुक्तांकडे देण्यात आली आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
8. तुर्कीवर भारतीय चित्रपटसृष्टीचा बहिष्कार
वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज फेडरेशनने तुर्कीमध्ये चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे तुर्कीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
9. महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार – संजय राऊत यांची घोषणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे.
10. ठाण्यात मेट्रो 9 ची चाचणी – पहिल्या टप्प्याचे 96% काम पूर्ण
एमएमआरडीएकडून ठाण्यात मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पहिला टप्पा 4.4 किमी लांबीचा असून 8 स्थानके असतील.