PM Modi Live Updates | 1. पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा : “टेरर आणि टॉक एकत्र शक्य नाही”
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण करत पाकिस्तानला कडक इशारा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही.” तसेच, “पाणी आणि रक्ताचे पाट एकत्र वाहू शकत नाहीत,” असेही ते म्हणाले. मोदींनी स्पष्ट केले की, पाकिस्तानशी चर्चा करायचीच असेल, तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीर व दहशतवादावरच होईल.
2. ऑपरेशन सिंदूरमधील यशानंतर पंतप्रधानांचा गौरव : “सैनिकांचे धैर्य अद्वितीय”
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या शूर सैनिकांचे, गुप्तचर यंत्रणांचे व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले, “भारताच्या प्रत्येक मुली, बहिणी आणि आईसाठी हे ऑपरेशन समर्पित आहे. आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले.”
3. DGMO बैठक : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबाबत लष्करी पातळीवर चर्चा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी झालेल्या युद्धविरामानंतर आज दोन्ही देशांच्या डीजीएमओ पातळीवर चर्चा झाली. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून हल्ला होईल, याची कल्पना आधीच होती. त्यामुळे तिन्ही सेनादलांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
4. अदित्य ठाकरेंचा स्पष्ट संदेश : “काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही”
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करून म्हटले, “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो कोणत्याही चर्चेचा विषय होऊ शकत नाही.” त्यांनी केंद्र सरकारकडून जागतिक पातळीवर हे स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
5. शरद पवार यांची अमेरिकेला सुनावणी : “हा आमचा घरगुती वाद आहे”
भारत-पाक संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “हा आमचा घरगुती वाद आहे. तिसऱ्या राष्ट्राने हस्तक्षेप करू नये. शिमला कराराच्या स्मरणाने त्यांनी हे विधान बळकट केले.
6. शेअर बाजारात प्रचंड तेजी : सेन्सेक्स 3000 अंकांनी, निफ्टी 916 अंकांनी वधारला
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी व आंतरराष्ट्रीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स 2,975 अंकांनी वधारून 82,429 वर बंद झाला, तर निफ्टी 916 अंकांनी वाढून 24,924 वर पोहोचला. गुंतवणूकदारांनी 11 लाख कोटींची कमाई केली.
7. तुर्की आणि अजरबैजानवर बहिष्कार : पाकिस्तानला पाठिंबा भोवणार
तुर्की आणि अजरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यावर भारतात संताप व्यक्त करण्यात आला आहे. ट्रॅव्हल असोसिएशनने या दोन्ही देशांवर पर्यटन बंदी घातली असून, पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून येणाऱ्या सरफरचंदावर बहिष्कार टाकला आहे.
8. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा : तुर्की कंपनी हटवण्याची मागणी
शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी तुर्की कंपनीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. “भारतामध्ये पैसे कमवायचे आणि पाकिस्तानला मदत करायची – हे आम्हाला चालणार नाही,” असे ते म्हणाले. विमानतळावरून तुर्की कंपनी हटवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
9. भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद : GDP ग्रोथ 6.5% पेक्षा अधिक राहणार – CII
CII ने दिलेल्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी दर 6.5% पेक्षा अधिक राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. देशातील युद्धसदृश परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था सक्षम आहे, असा विश्वास CII अध्यक्ष संजीव पुरी यांनी व्यक्त केला.
10. पाकिस्तानात भूकंपाचे धक्के : बलुचिस्तानमध्ये 4.6 रिस्टेल तीव्रतेचा भूकंप
भारतासोबत झालेल्या संघर्षानंतर आता पाकिस्तानला निसर्गाचा दणकाही बसला आहे. बलुचिस्तानमध्ये 4.6 रिस्टेल स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले असून, यामुळे संभाव्य नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्यातील हा तिसरा भूकंप होता.