Maharashtra Top 10 News Aditya Thackeray | 28 एप्रिल 2025

Maharashtra Top 10 News Aditya Thackeray | १. आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात :
मुंबईतील बेस्ट बस सेवेला दुर्लक्षित करून सामान्य मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यावर गदा आणली जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ करण्याच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटले, “सत्ताधाऱ्यांचा हेतूच आहे की सामान्य माणसाचं आयुष्य कठीण व्हावं.” जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टचा असा अधःपात होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

२. यवतमाळमध्ये दुर्दैवी घटना :
यवतमाळ जिल्ह्यातील वागद गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी अधिकारी झाली म्हणून पेढे वाटत असताना वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी खंदारे हीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८८४ वा क्रमांक मिळाला होता. या आनंदाच्या क्षणी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

३. अबू आझमींची दहशतवादावर टीका :
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दहशतवाद्यांवर कठोर शब्दांत टीका केली. “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, भारतात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले. तसेच भारतीय मुस्लिम बांधव सरकारसोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

४. भरत गोगावले यांची पालकमंत्रिपदावरील आशा :
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत पुन्हा आशावाद व्यक्त केला आहे. पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितले की, वाघेश्वर देवस्थानच्या आशीर्वादाने त्यांच्या पालकमंत्रिपदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

५. दत्ता दळवींचा ठाकरे गटाला धक्का :
शिवसेना (ठाकरे गट) चे माजी महापौर दत्ता दळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६. पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट :
उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत. या घटनेने पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

७. प्रताप सरनाईक यांचे एसटी महामंडळासाठी निर्देश :
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर अहवाल मांडण्यासाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. महामंडळावर सध्या १० हजार कोटींचा संचित तोटा असून आर्थिक शिस्त आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

८. नरहरी झिरवाळ यांचे जलजीवन योजनेवर वादग्रस्त विधान :
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जलजीवन योजनेला फेल ठरवत ती केंद्र सरकारच्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली अयशस्वी झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नवे वाद निर्माण झाले आहेत.

९. सोलापूर बाजार समिती निकाल :
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्या चार जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या आहेत, तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाला एक जागा मिळाली आहे.

१०. विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका :
महायुती सरकारच्या घोषणांवर टीका करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचे जाहीर केले होते, पण आता तेही जुमला ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारच्या नियतीतच खोट आहे, असा घणाघात त्यांनी केला.

Leave a Comment